लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अनेक नागरिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करताना दिसून येत नाही. यामुळे मंगळवारी चक्क संपूर्ण जिल्हा प्रशासनाची यंत्रणेने रस्त्यावर उतरून नियमभंग करणाऱ्या विरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन. पाटील, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी व उपायुक्त संतोष वाहुळे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली.
शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे शहरातील मुख्य बाजारपेठ भागात गर्दी कमी होताना दिसून येत नाही. त्यातच अनेक नागरिक विनामास्क शहरात फिरताना दिसून येत आहेत. यासह अनेक दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे देखील पालन होत नसल्याचे आढळून येत आहे. प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना देऊनदेखील व अनेकवेळा कारवाया करूनदेखील नागरिकांना शिस्त लागत नसल्याने मंगळवारी प्रशासनाचे मुख्य अधिकारी ॲक्शन मोडमध्ये आलेले दिसून आले. सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे व मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी शहरातील मुख्य बाजार पेठ भागात पाहणी केली. महात्मा फुले मार्केट परिसरातून पाहणीला सुरुवात करण्यात आली. मुख्य बाजारपेठ भागात विनामास्क फिरणाऱ्यांवरदेखील जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली.
अधिकार्यांचे पथक पोहोचताच बाजारपेठेत पळापळ
सर्वच विभागातील मुख्य अधिकाऱ्यांचे पथक तपासणीसाठी आल्यानंतर संपूर्ण बाजारपेठ परिसरात एकच पळापळ सुरू झाली. ज्या दुकानांमध्ये प्रमाणाबाहेर गर्दी होती अशा दुकानांमधून दुकानदारांनी ग्राहकांना तत्काळ बाहेर काढले. तसेच फुले मार्केट भागात अतिक्रमण करून दुकाने थाटत असलेल्यांनीदेखील अधिकाऱ्यांचा ताफा पाहताच साहित्य जमा करून पळ काढला, तर ज्यांनी मास्क घातला नव्हता त्यांनी अधिकाऱ्यांचा ताफा पाहताच तोंडावर रुमाल लावून घेतला.
पळ काढणाऱ्यांना पकडून केली कारवाई
फुले मार्केट व गोलानी मार्केट भागात पोलिसांचे पथक पाहताच अनेकांनी पळ काढला. मात्र मास्क न लावणाऱ्यांचा पाठलाग करून त्यांना पकडून त्यांच्यावर दंड करण्यात आला. तसेच सुभाष चौक, शिवाजी रोड व बळीराम पेठ या भागात अनधिकृतपणे दुकाने थाटात असलेल्या हॉकर्सवरदेखील मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कारवाई करण्यात आली. अनेकांचे साहित्यदेखील महापालिका प्रशासनाने जप्त करून घेतले.
५२ जणांना दंड; बँक ऑफ बडोदा प्रशासनालाही सूचना
विनामास्क फिरत असलेल्या ५२ जणांना जिल्हाधिकारी व आयुक्तांनी प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड ठोठावला. यासह पाहणी करत असताना नवी पेठ भागातील बँक ऑफ बडोदामध्येदेखील खातेदारांची मोठी गर्दी जिल्हाधिकाऱ्यांना दिसून आली. जिल्हाधिकाऱ्यांनी बँकेत जाऊन बँक मॅनेजरला गर्दी कमी करण्याबाबत सूचना दिल्या. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाडण्याबाबतदेखील सूचना देण्यात आल्या. यासह अनेक दुकानदारांनादेखील मनपा उपायुक्तांनी सूचना देत नियमांचे पालन करण्याचे सांगितले. सात ते आठ दुकानदारांनादेखील मनपाने नोटिसा बजावल्या असून, यापुढे नियमांचा भंग झाल्यास थेट गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा उपायुक्तांनी दिला आहे.
या भागात केली पाहणी
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत शहरातील मुख्य बाजारपेठ भागातील फुले मार्केट, शिवाजी रोड, दाणा बाजार, सुभाष चौक, चित्रा चौक, नवी पेठ, टॉवर चौक व गोलानी मार्केटमध्ये जाऊन पाहणी केली.