लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : घरफोडी, सोनसाखळी लांबविण्याच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे तर दुसरीकडे दुचाकी चोरीच्या घटना मात्र मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. जळगाव शहरातून रोज तीन ते चार दुचाकी चोरी होत आहेत. या चोरलेल्या दुचाकींचे भंगार बाजारात अवघ्या २० मिनिटात स्पेअर पार्ट मोकळे केले जात असून काही दुचाकी जिल्ह्याचा सीमेलगत असलेल्या खेडेगावांमध्ये अवघ्या ५ ते १० हजार रुपयात विक्री केल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात शहरातील सहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल ७४ दुचाकी चोरी झालेल्या आहेत. त्यातील फक्त १२ दुचाकी सापडल्या आहेत. महिन्याला सरासरी १५ ते २० दुचाकी चोरी होत आहेत. ही कागदावरची आकडेवारी असली तरी अनेक जण तक्रार देणे टाळतात, त्यामुळे तसा आकडा हा आणखी वाढतो.
शहरात सर्वाधिक दुचाकी या जळगाव शहर व एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी झालेल्या आहेत. फुले मार्केट, गोलाणी मार्केट, तहसील कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर, एमआयडीसी, जिल्हा रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय या भागातूनच सर्वाधिक दुचाकी चोरी झालेल्या आहेत. बनावट चावी किंवा विशिष्ट पद्धत वापरून लॉक तोडून दुचाकी चोरट्यांकडून लांबविली जात आहे. दुचाकी चोरटे शक्यतो शहराबाहेरचेच आढळून आलेले आहेत. शहरातून चोरलेल्या दुचाकी या खेडेगावात तसेच आदिवासी भागात कमी किमतीत विक्री केल्या जातात. त्याची कोणतीही कागदपत्रे दिली जात नाही. काही ठिकाणी कागदपत्रे देतो म्हणून थोडी रक्कम दुचाकी घेणाऱ्याकडे बाकी ठेवली जाते.
दुचाकी सापडल्या; मात्र बाहेरच्याच निघाल्या
स्थानिक गुन्हे शाखा व शहरातील इतर पोलीस ठाण्यांनी दुचाकी चोरट्यांना पकडले, त्यांच्याकडून दुचाकीही हस्तगत केल्या मात्र, या दुचाकी शहराऐवजी बाहेरच्याच असल्याचे निष्पन्न झाल्या आहे. भुसावळ, रावेर, जामनेर, एरंडोल, धरणगाव व अमळनेर या भागातील चोरलेल्या दुचाकी चोरट्यांकडून हस्तगत झालेल्या आहेत. काही मोजक्याच दुचाकी या शहरातील आढळून आल्या आहेत. त्यातील बहुतांश दुचाकी तर विहिरीतूनच काढण्यात आलेल्या आहेत. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतच विहिरीत जास्त दुचाकी सापडल्या होत्या.
धरण, नद्या व समुद्रात इंजीनचा वापर
चोरलेल्या दुचाकींचे इंजीन काढून ते मोठमोठ्या नद्या, धरण, तलाव त्याशिवाय समुद्रात वापरण्यात येत असलेल्या लहान बोटींसाठी वापरले जाते. जळगाव शहरातून चोरलेल्या दुचाकींचे इंजीन काढून गोव्यातदेखील पाठविण्यात आल्याची माहिती प्राप्त झालेली आहे. मोठे धरण व नद्यांमध्ये मासेमारी किंवा इतर कामांसाठी वापरण्यात येत असलेल्या बोटींना या दुचाकींचे इंजीन लावले जाते.
पोलीस स्टेशन चोरी झालेल्या दुचाकी सापडलेल्या दुचाकी
जळगाव शहर १६ ०६
जिल्हा पेठ १८ ०१
शनिपेठ १३ ०१
एमआयडीसी १५ ०३
जळगाव तालुका ०६ ००
रामानंद नगर ०७ ०२
एकूण ७४ १२