जळगाव - मनपा स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांनी शनिवारी अचानक प्रभाग समिती कार्यालयांना भेटी देत, मालमत्ताकराच्या
वसुलीचा आढावा घेतला. यासह प्रभाग समिती कार्यालयातील यंत्रणेची देखील माहिती घेतली. तसेच मालमत्ताकराच्या वसुलीसाठी पुढील
तीन महिन्यात काय-काय प्रयत्न करण्यात येतील याबाबतची माहिती देखील सभापतींनी घेतली.
प्रभागसमितीनिहाय उपमहापौर जाणून घेतील प्रश्न
जळगाव - उपमहापौर सुनील खडके यांनी ‘उपमहापौर आपल्या दारी’ या उपक्रमानंतर मंगळवारपासून प्रभाग समिती कार्यालयात बसून
नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत. मंगळवारी प्रभाग समिती क्रमांक १ मधील कार्यालयात उपमहापौर सकाळी ११ ते दुपारी २ या
वेळेत उपमहापौर बसणार असून, याठिकाणी येणाऱ्या नागरिकांकडून समस्या जाणून घेणार आहेत. तसेच मागील उपक्रमात आलेल्या
तक्रारींचा आढावा देखील उपमहापौर अधिकाऱ्यांकडून घेणार आहेत.
बिल्डिंग पेंटर कामगारांच्या मागण्यांची त्वरित पूर्तता करा
जळगाव- जिल्ह्यातील बिल्डिंग पेंटर कामगारांचे कोरोना काळापासून फार हलाखीचे दिवस सुरू असून अनेक शासकीय योजनांपासून
त्यांना वंचित राहावे लागत आहे. बिल्डिंग पेंटर कामगारांच्या विविध मागण्यांसाठी हिंदू मुस्लीम एकता बिल्डिंग पेंटर युनियनतर्फे
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन देण्यात आले. यावेळी हिंदू मुस्लीम एकता बिल्डिंग पेंटर युनियनचे अध्यक्ष इस्माईल खान,
उपाध्यक्ष कृष्णा सपकाळे, सचिव अकील खान आदी उपस्थित होते.
मनपा स्थायीची उद्या सभा
जळगाव - मनपा स्थायी समितीच्या सभेचे आयोजन ३० रोजी सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता
मनपाच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात करण्यात आले आहे. कोरोनामुळे मार्च महिन्यापासून स्थायी समितीची सभा सभागृहात झालेली
नव्हती. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ९ महिन्यानंतर मनपाच्या सभागृहात स्थायी ची सभा होणार आहे. सभेत एकूण ९ विषय
मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत.
९ प्रभागात रस्ते दुरुस्तीला सुरुवात
जळगाव- मनपा फंडातून शहरातील रस्ते दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली असून, आतापर्यंत ९ प्रभागांमध्ये कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, अद्यापही उर्वरित दहा प्रभागांमध्ये कामाला सुरुवात झालेली नाही. अमृत अंतर्गत भुयारी व पाणी पुरवठा योजेनेचे काम होत असल्याने या प्रभागात कामाला सुरुवात झालेली नसल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.