जळगाव : जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी येथे मूकबधीर मुलांसाठीच्या साहित्य वाटप कार्यक्रमात कमरेला पिस्तूल खोचून भाषण केल्याने वादंग निर्माण झाला आहे. खुलेआम पिस्तूल बाळगणाऱ्या मंत्रीमहोदयांना पोलीस यंत्रणेवरच विश्वास नाही का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.आपल्या कृतीवर राजकीय पडसाद उमटताच पिस्तूल दसऱ्याला शस्त्रपूजनासाठी दिलेले नसून स्वसंरक्षणासाठी दिले आहे. त्यामुळे ते जवळ बाळगण्यात गैर काय, असा उलट प्रश्न महाजन यांनी केला.राष्ट्रवादी काँग्रेसने महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हा विषय अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.शनिवारी जळगावमधील कार्यक्रमात गिरीश महाजन यांनी कमरेला पिस्तूल खोचलेले असल्याचे उपस्थितांच्या नजरेतून सुटले नाही. महाजन यांनी व्यासपीठावर उभे राहून खा. ए. टी. पाटील, आ. सुरेश भोळे, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या उपस्थितीतच भाषणही केले होते. महाजन यांना झाल्या प्रकाराबाबत विचारले असता ते म्हणाले, काँग्रेसचे सरकार असतानाच रितसर परवाना घेऊन हे पिस्तूल स्वसंरक्षणासाठी घेतले आहे. गेल्या २५ वर्षांपासून मी ते जवळ बाळगतो. आताही पोलीस संरक्षण असले तरीही केव्हा काय प्रसंग ओढवेल, हे सांगता येत नाही. पोलीस बंदोबस्त असूनही हल्ला झाल्याची अनेक उदाहरणे सांगता येतील. तसेच हे रिव्हॉल्वर आपण खिशात ठेवतो. ते दाखवून कुणाकडून खंडणी मागितलेली नाही. अथवा आपले कोणतेही अवैध धंदे नाहीत. सामाजिक कार्य करीत असताना रात्री बेरात्री एकट्याने फिरावे लागते. तेव्हा संरक्षण म्हणून हे पिस्तूल जवळ बाळगण्याची सवय झाली आहे. (प्रतिनिधी)
कमरेला पिस्तूल खोचून जलसंपदामंत्र्यांचे भाषण!
By admin | Published: March 30, 2015 2:33 AM