लोकमत ऑनलाईन धरणगाव, जि.जळगाव, दि. 27 : तालुक्यातील भाजपा- शिवसेनेमधील वाद पुन्हा चव्हाटय़ावर आला आहे. संजय गांधी निराधार योजनेतील बोगस लाभार्थ्ीच्या मुद्यावर बदनामी केल्याने सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची परवानगी मिळावी यासाठी धरणगाव न्यायालयात खासगी खटला दाखल केला आहे. संगांयोचे सदस्य विशाल संजय पाटील (रा.साकरे, ता.धरणगाव) यांनी हा खटला दाखल केला आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, ते व वैशाली पंढरीनाथ पाटील हे संजय गांधी योजनेचे सदस्य आहेत. 12 सप्टेंबर रोजी गुलाबराव पाटील हे साकरे येथे सांत्वनासाठी आले होते. त्यावेळी एका व्यक्तीने संगांयोचे अनुदान का बंद झाले आहे? अशी विचारणा केली. त्यावेळेस गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, पी.सी. पाटील यांच्यामुळे तुमचे अनुदान बंद झाले आहे. पी.सी.यांच्या पत्नी व विशाल पाटील यांनी यासंदर्भात तक्रारी अर्ज दिल्याने गोरगरीबांचे पगार बंद झाल्याचे सांगून बदनामीकारक विधान केल्याचे म्हटले आहे. तसेच पी.सी.पाटील हे येत्या विधानसभेसाठी भाजपातर्फे उमेदवार असल्याने गुलाबराव पाटील यांनी बदनामी सुरु केल्याचे यात नमूद केले आहे. याची चौकशी होऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अॅड.शरद माळी यांच्यावतीने हा खटला दाखल केला आहे. न्या. सचिन भावसार यांनी खटला दाखल करुन घेऊन पुढील सुनावणी 11 ऑक्टोबरला आहे.
सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटलांविरुद्ध न्यायालयात खासगी खटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 1:44 AM
संजय गांधी योजना चौकशी : बदनामी केल्याचा आरोप
ठळक मुद्देभाजपा- शिवसेनेमधील वाद पुन्हा चव्हाटय़ावरसंजय गांधी निराधार योजनेतील बोगस लाभार्थ्ीचा मुद्दापुढील सुनावणी 11 ऑक्टोबरला होणार