ऑनलाईन लोकमत
गोंडगाव, जि. जळगाव, दि.8 - भडगाव तालुक्यातील श्री क्षेत्र कनाशी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त 9 रोजी दाढ विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी कनाशी येथे भव्य यात्रा भरते व या यात्रेसाठी देशभरातून भाविक येतात. भाविक नारळ, विडय़ाची पाने, सुपारी आदी साहित्याचा विडा अवसर आणत असतात. मनोकामना पूर्ण होण्यासाठी व जुने आजार बरे होण्यासाठी भाविक खास या दाढ दर्शनासाठी येतात. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन कवीश्वर कुलाचार्य खामणीकर बाबा यांच्या नेतृत्वाखाली केले आहे. महानुभव पंथीयांच्या दृष्टीने दाढ विशेषला अनन्य साधारण महत्त्व आहे. यात्रेनिमित्र कजगाव प्रा.आ. केंद्रामार्फत भाविकांना औषधी पुरविण्याची व्यवस्था केली आहे. गावागावातून दिंडय़ाही येथे दाखल होतात. येथे मास-मटण कुणीही गावकरी खात नाही. संपूर्ण गाव महानुभव पंथी आहे. भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन कनाशी ग्रामस्थ व खामणीकर बाबा यांनी केले आहे.