सुविधा : जळगाव स्टेशनला थांबा असल्यामुळे प्रवाशांना दिलासा
जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे टप्प्या-टप्प्याने लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्यात येत असून, येत्या ८ डिसेंबरपासून पुन्हा सिकंदराबाद व जयपूरसाठी विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. या सुपरफास्ट गाड्यांना जळगावला थांबा देण्यात आला असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दर मंगळवारी व बुधवारी (गाडी क्रमांक ०२७८९ ) सिकंदराबादहून ही गाडी सकाळी ११.३० वाजता सुटणार असून, जळगावला दुपारी पावणेदोन वाजता येणार आहे. जळगावहून पुढे अमळनेर व सुरतमार्गे हिसार येथे तिसऱ्या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता पोहोचणार आहे, तर परतीच्या प्रवासाला (गाडी क्रमांक ०२७९०) हिसार येथून ११ नोव्हेंबरला दुपारी पाउण वाजता निघून जळगावला सायंकाळी पावणेसहा वाजता येणार आहे.
तसेच गाडी क्रमांक (०७०२०) हैदराबाद जयपूर ही डाऊन गाडी हैदराबादहून दुपारी सव्वातीन वाजता निघून जळगावला दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वासहाला पोहोचेल, तर परतीच्या प्रवासासाठी( क्रमांक ०७०१९) जयपूरहून ही गाडी सव्वातीन वाजता निघून जळगावला दुसऱ्या दिवशी दुपारी सव्वादोन वाजता पोहोचणार आहे.
इन्फो :
तिकीट आरक्षण असल्यावरच गाडीत प्रवेश
या दोन्ही गाड्या संपूर्ण वातानुकूलित असून, या गाड्यांना जनरल बोगी नाहीत. त्यामुळे या गाड्यांना ज्या प्रवाशांचे तिकीट आरक्षित असेल, अशा प्रवाशांनाच प्रवेश दिला जाणार आहे, असे भुसावळ रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.