सुविधा : जळगाव थांबा असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळणार
जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे ८ डिसेंबरपासून सिकंदराबाद व जयपूरसाठी विशेष गाड्या सुरू करण्यात आल्यानंतर, आता नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवरही १७ डिसेंबरपासून काही विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाड्यांनाही जळगावला थांबा देण्यात आल्याने स्थानिक प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
सध्या कोरोनाकाळातही काही रेल्वे गाड्या सुरू असल्या तरी या गाड्यांना आरक्षण मिळत नसल्यामुळे प्रवाशांना खासगी बसने प्रवास करावा लागत आहे. मात्र, आता ८ तारखेपासून सुरू झालेल्या विशेष गाड्या आणि १७ डिसेंबरपासून पुन्हा नाताळसाठी सुरू होणाऱ्या गाड्यांमुळे प्रवाशांना प्रवासासाठी विविध गाड्यांचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. या विशेष गाड्यांमध्ये गाडी क्रमांक ०८५०१-२ ही दि. १७ ते ३१ डिसेंबरपर्यंत विशाखापट्टणम ते गांधीधामदरम्यान धावणार आहे. विशाखापट्टणम येथून सायंकाळी साडेपाच वाजता सुटेल. जळगावला दुसऱ्या दिवशी पावणेतीन वाजता पोहोचणार आहे, तर परतीच्या प्रवासासाठी गांधीधाम येथून रात्री ११ वाजता सुटेल. जळगावला दुसऱ्या दिवशी दुपारी दीड वाजता पोहोचणार आहे. तसेच ०२८२८-२७ क्रमांकाची गाडी दि. १५ ते २९ डिसेंबरदरम्यान दर मंगळवारी धावणार आहे. ही गाडी पुरीहून सकाळी ८ वाजता सुटेल. जळगावला दुसऱ्या दिवशी दुपारी दीड वाजता पोहोचणार आहे, तसेच परतीच्या प्रवासात ही गाडी दुसऱ्या दिवशी रात्री दहा वाजता जळगावला येणार आहे. दरम्यान, नाताळच्या पार्श्वभूमीवर रेल्वेतर्फे एकूण पाच विशेष गाड्या सोडण्यात येणार असून, यामध्ये दोन गाड्यांना जळगावला थांबा देण्यात आला आहे, तर उर्वरित गाड्यांना भुसावळला थांबा देण्यात आला आहे.
इन्फो
तिकीट आरक्षित असल्यावरच गाडीत प्रवेश
या विशेष गाड्यांमध्ये वातानुकूलित व विनावातानुकूलित डबे असून, ज्या प्रवाशांचे तिकीट आरक्षित असेल, अशा प्रवाशांनाच गाडीत प्रवेश दिला जाणार आहे. प्रतीक्षा यादीत असलेल्या प्रवाशांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे भुसावळ रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.