लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या वेगात सुरू आहे. गेल्या १५ ते २० दिवसांपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे या मार्गावरील रहदारी कमी झाली असून कामाचा वेगदेखील वाढला आहे. या महिनाभरात शहरातील महामार्गाला जोडणारे सुमारे २० लहान जंक्शन पूर्ण करण्यात आले. कालिकामाता मंदिर आणि इच्छादेवी मंदिर येथे पाइप कल्व्हर्टचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तसेच सालारनगरातील पूल आणि विद्युत कॉलनीतील लहान पूल यांचे कामदेखील वेगात सुरू आहे.
गेल्या १५ ते २० दिवसांपासून लॉकडाऊन लावण्यात आले आहे. दुपारी १२ नंतर बहुतेक रस्त्यांवर अत्यंत कमी गर्दी असते. या कमी रहदारीने शहरातून जाणाऱ्या या चौपदरीकरणाच्या कामाला चांगलाच वेग आला आहे. या रस्त्याचे जवळपास ७० टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांनी दिली.
या विद्युत कॉलनी येथे नाल्यावरील लहान पूल, सालारनगर येथील पूल, गुजराल पेट्रोलपंप ते दादावाडी येथील आरई वॉलच्या भरावाचे काम वेगात सुरू आहे.
शहरातून जाणा-या महामार्गाचे चौपदरीकरण हे ७ किमीचे अंतर असून त्यासाठी ६२ कोटींच्या निविदेला मंजुरी देण्यात आली आहे. या कामाची मुदतही जूनपर्यंत आहे. मात्र, पहिल्या लॉकडाऊनच्या काळात ही सर्व कामे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे आता या कामांना मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या कडक निर्बंधांमध्ये संचारबंदी कायम आहे. तरी ही कामे सुरू ठेवण्यास शासनाने परवानगी दिल्याने कामे वेगात होत आहेत.
कोट - सध्या महामार्गावर रहदारी कमी आहे. त्यामुळे साहजिकच कामाचा वेगदेखील वाढला आहे. सध्या गुजराल पेट्रोलपंप आरई वॉलच्या भरावाचे काम वेगात सुरू आहे. तसेच इच्छादेवीत १२०० मिमीच्या पाइप कल्व्हर्टचे कामदेखील पूर्णत्वास आले आहे. या महामार्ग चौपदरीकरणाचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. - चंद्रकांत सिन्हा, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण