ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.25 : केंद्र शासनाच्या उडाण योजनेतून सुरू होत असलेल्या विमानसेवेचा 15 सप्टेंबरला शुभारंभ करण्याचे नियोजन असून त्या दृष्टीने विमानतळ प्राधिकरणाने जळगाव विमानतळावर विविध सुविधा उपलब्ध करण्यासाठी कामांना गती दिली आहे.
केंद्र शासनाने जाहीर केलेल्या उड्डाण योजनेत नवे 45 विमान मार्ग जाहीर करण्यात आले आहेत. यात महाराष्ट्रातील पाच जिलंचा समावेश करण्यात आला असून जळगाव येथेही विमानसेवा प्रस्तावित करण्यात आली आहे. जळगाव ते मुंबईचे अंतर या सेवेमुळे आणखी कमी होणार असून उद्योजक, व्यापारी, अधिकारी तसेच नागरिकांसाठी ही सेवा मोठी उपलब्धी ठरणार आहे.
पुढील महिन्यात समिती येणार
15 सप्टेंबरला ही सेवा सुरू करण्याचे प्रस्तावित असल्याने विमान विकास प्राधिकरणाची एक समिती पुढील महिन्यात जळगावी येऊन येथे झालेल्या तयारीचे अवलोकन करेल. कामकाजातील त्रुटी दूर करून आपला अहवाल ही समिती विमान विकास प्राधिकरणास सादर करेल.
तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते विमानतळाचे उद्घाटन झाले. गेल्या महिन्यातच स्थानिक अधिका:यांना विमान सेवेबाबतचे पत्र प्राप्त झाले होते. त्यानुसार कामांना गती देण्यात आली आहे. विमानतळावरील 1700 मीटरची धावपट्टीवरील किरकोळ कामे, एकाच वेळी दोन विमाने थांबू शकतील अशी व्यवस्था असल्याने विमान पार्किगच्या जागेतील कामे, यासह प्रतीक्षालय व अन्य कामे जवळपास पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.
90 मिनिटात मुंबईत
एअर डेक्कनच्या माध्यमातून जळगावात 72 आसनी विमानसेवा प्रस्तावित करण्यात आली आहे. या विमान सेवेसाठी 2500 भाडे प्रति व्यक्तीस मोजावे लागेल. जळगावहून निघालेले हे विमान अवघ्या 90 मिनिटात मुंबईत पोहचेल असे सूत्रांनी सांगितले.
अशी मिळेल सेवा
प्राप्त वृत्तानुसार मुंबईहून सकाळी 10.05 वाजता विमान निघेल ते 11 वाजून 35 मिनिटांनी जळगाव विमानतळावर येईल. जळगावहून हे विमान 11 वाजून 50 मिनिटांनी मुंबईकडे रवाना होईल.