जादा डबे जोडण्याची मागणी
जळगाव : सध्या सुरू असलेल्या कुशीनगर एक्स्प्रेस, काशी एक्स्प्रेस, हावडा एक्स्प्रेस व इतर गाड्यांना जनरल डब्यांची संख्या कमी असल्यामुळे, प्रवाशांची गैरसोय होत आहे. यामुळे प्रवाशांना उभे राहूनच प्रवास करावा लागत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने या गाड्यांना जादा डबे जोडण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.
लग्नसराईमुळे बसेसला गर्दी
जळगाव : रविवारी लग्नसराईची मोठी तीथ असल्यामुळे धुळे, औरंगाबाद, पाचोरा, चाळीसगाव या मार्गावरील बसेसला सकाळपासूनच गर्दी होती. प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, प्रशासनातर्फे वेळापत्रकानुसार बसेस सोडण्यात येत होत्या. दरम्यान, आगार प्रशासनातर्फे दुपारनंतर नाशिकला जाण्यासाठी कमी बसेस असल्यामुळे प्रवाशांची काहीशी गैरसोय होताना दिसून आली.
बेशिस्त वाहनधारकांवर कारवाईची मागणी
जळगाव : रेल्वे स्टेशनवर तिकीट आरक्षित करण्यासाठी येणारे नागरिक रस्त्यावर बेशिस्तरीत्या दुचाकी उभ्या करत असल्यामुळे, स्टेशनात जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सायंकाळच्या सुमारास तर चालण्यासाठींही वाट राहत नाही. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी या बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहतूक कोंडी
जळगाव : कोर्ट चौकातून गणेश कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्यामुळे वाहनधारकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. खड्डे व दगड-गोटे वर आल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्याही उद्भवत आहे. तरी मनपा प्रशासनाने या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.