पंडित वाचक जरी झाला पुरता। तरी कृष्ण कथा ऐके भावे । क्षीर तूपा साकरे जालिया भेटी | तैसी पडे मिठी गोड पणे।।
जाणोनिया लाभ घेई हा पदरी, गोड गोडावरी सेंवी बापा । जाणिवेचे मूळ उपडोनी खोड, जरी तुज चाड आहे तुझी।।
नाना परिमळ द्रव्य उपचार, अंगी उटी सार चंदनाची।
जेविलियाविण शून्य ते शृंगारी, तैसी गोडी हरी कथेविंण ।
ज्याकारणे वेद श्रुती ही पुराणें, तेचि विठ्ठलनामे तिष्ठे कथे। तुका म्हणे येर दगडाची पेंवे, खळ खळीचे अवघे मूळ तेथे।।
माणूस कितीही सुशिक्षित झाला, तरी त्याने हरिकथा, कीर्तन, श्रवण सोडू नये. या अर्थी तुकाराम महाराज वेद, वेत्ता, पुराणिक कथा, कीर्तन न ऐकणारा अशा माणसाला या अभंगातून उपदेश करीत आहेत.
तू जरी पंडित किंवा पुराणिक झाला असलास, तरी पण भक्तिभावाने कृष्ण कथा ऐक. जसे दूध, तूप आणि साखर यांचा संयोग झाला असता अधिकच गोडी येते, त्या प्रमाणे तू विद्वान तर आहेसच, त्यात कृष्णकथा ऐकलीस तर गोडपणाची विशेष भर पडेल.(१)
अरे बाबा, कृष्ण कथेचे महत्त्व लक्षात घेऊन हा लाभ पदरात पाडून घे. पांडित्याच्या गोड रसावर अधिक गोड, अशा कृष्ण कथेचे सेवन कर. जर तुला आत्मप्राप्तीची इच्छा असेल तर देहाभिमानाचे मूळ असलेले अविद्येचे खोड उपटून टाक. (२)
जसे अनेक सुगंधी द्रव्यांच्या भोगांमध्ये अंगाला चंदनाची उटी लावणे महत्त्वाचे आहे, तसे अनेक प्रकारच्या महत्त्वामध्ये हरिकथा श्रवण करणे, विशेष महत्त्वाचे आहे. पोटात अन्न नसता देहाला वर वर शृंगारणे जसे व्यर्थ आहे तसे हरिकथेवाचून विद्वतेचि खरी गोडी नाही ।(३)
ज्यांच्याकरिता वेद, श्रुती आणि पुराणे यांची प्रवृत्ती आहे ते विठ्ठलरूपी धन कथेमध्ये उभे असते. श्री तुकाराम महाराज म्हणतात, हरिकथेवाचून विद्वत्ता संपादन करणे म्हणजे दगडाचे पेव उपसल्यासारखे आहे व केवळ नाहक प्रयत्न करणे होय. (४)
साधारणत : माणूस वेद-पुराण जाणू लागला की, त्याच्या मनामध्ये अहंकाराचा उदय होतो व त्याची अवस्था ‘अंगी भरीला ताठा कोणासी मानींना’ अशी होते. परंतु, हरिकथेशिवाय हे सर्व व्यर्थ आहे, असे श्री तुकाराम महाराज म्हणतात. कथा, कीर्तन यामध्ये भगवंताचे भजन होते व भगवंताच्या भजनाच्या योगाने माणसांच्या पापाचे भंजन होते. महाराज म्हणतात की, माणसाला मोठेपण हे भगवंताच्या भजन, कीर्तन, कथेने येते. वेदपाठ, पुराण श्रवण हे तर महत्त्वाचे आहेच, पण त्याला हरिकथा, कीर्तन, भजन यांची साथ मिळाली तर दुग्धशर्करायोग निर्माण होतो. महाराज म्हणतात, ‘तुका म्हणे येथे भजन प्रमाण। काय थोर पण जाळावे ते।।’
निरूपण : ह. भ. प. दादा महाराज जोशी