भलामोठा गणपरिवार मिळाला. माथ्यावर जटाभार, कमरेला व्याघ्रचर्म, हाती त्रिशूळ, डमरू हे रूप मिळाले. मुख्य म्हणजे केवळ उग्र रूप न राहता, शिव हा कलेचाही देव नटराज झाला. त्याचे मंगलकारक रूप इतके रुजले की 'मंगल' या शब्दाला प्रतिशब्दच 'शिव' हा आहे. पण, तरीही आपला मूळ स्वभाव शिवाने सोडलेला नाही. तो भोलेनाथ असला, तरी त्याच्या कपाळावर अग्निक्षेपी तिसरा डोळा आहे. त्याच्या संतापाच्या कित्येक कथा प्रचलित आहेत.
वेदकालीन रुद्राची परंपरा शिवरूपातही काही वेळा दिसतेच. आजही शंकराच्या स्तुतीसाठी म्हटलेल्या श्लोक रचनेला 'लघुरुद्र', 'महारुद्र' असेच म्हणतात. वेदकाळी रुद्र अकरा रूपांत विभागला होता.
शिवपुराणानुसार ते अकरा रुद्र म्हणजे कपाली, पिंगल, भीम, विरुपाक्ष, विलोहित, शास्ता, अजपाद, अहिर्बुध्न्य, शंभू, चण्ड आणि भव. हीच नावे उपनिषद अथवा पुराणांनुसार बदललेली पण दिसतात. पण ती ११ आहेत ही मान्यता आहे. त्यामुळे रुद्रपठण हे नेहमी अकराच्या पटीत होते. अथर्व वेदात रुद्राची सात नावे आलेली आहेत. पण, रुद्राभिषेकाचे श्लोक यजुर्वेदाच्या तैतरीय संहितेत येतात. मुळात ऋग्वेदात रुद्राला समर्पित अशी केवळ तीनच सूक्ते आहेत. पुढे कालांतराने रुद्र ही महत्त्वाची देवता होत गेली. अखेर शिवरूपात आल्यानंतर रुद्र ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिमूर्तीपैकी एक होऊन महादेव बनला.
रुद्र रूपात असताना तो सजीवसृष्टीपासून लांब होता. पण, शिवरूपात विरघळल्यानंतर तो प्राणिसृष्टीचा 'पालक' झाला. 'पशुपती' झाला. सामान्य माणसालाही त्याची भक्ती सहज करता यावी, इतके त्याचे रूप सोपे झाले ते म्हणजे शिवलिंग. आज भारतात कानाकोपऱ्यातील अतिप्राचीन लहान-मोठी मंदिरे पाहिली, तर शिवलिंग असलेली मंदिरे सगळ्यात जास्त आढळतील. ऋग्वेदातील रुद्रापासून ते शिवपुराणातील शंकरापर्यंतचे हे 'आयन' आहे.
एक गोष्ट लक्षात आली का? आपल्या संस्कृतीत हक्काने 'अमृत'प्राशन करणाऱ्या इंद्राला 'महादेव' मानत नाहीत; तर, लोकांसाठी 'हलाहल' प्राशन करणाऱ्या, स्वत:चा कंठ जाळून घेणाऱ्या शंकराला 'महादेव' म्हणून परम आदराचे स्थान आहे.
आज समाजसेवा करू इच्छिणाऱ्या कोणीही हा फरक नेहमी लक्षात ठेवावा.
निरुपण : सुशील अत्रे (उत्तरार्ध)