आपल्या आत्म्याच्या तीन शक्ती आहेत, त्या मन, बुद्धी आणि संस्कार या होत. पैकी मन हे चंचल आहे, अश्वासारखे आहे, पाण्यासारखे आहे वगैरे उपमा आपणास माहिती आहेतच. पण याच मनात अगाध शक्ती दडलेल्या आहेत. त्यायोगे अनेक म्हणी, सुविचार तयार झालेले आहेत जसे - मन जीते जगत जीत, मन चंगा तो कठोत्ती में गंगा, मन ही हारे हार- मन ही जीते जीत वगैरे.
परंतु , एक महत्त्वाची बाब आपणा सर्वांना माहिती असेलच की, एखादी घटना घडणार असेल तर प्रथम मनात नको त्या गोष्टी सर्वप्रथम गर्दी करतात, अर्थात नकारात्मतेकडे मन प्रथम ओढले जाते. जसे शाळेतून येण्यासाठी मुलाला जरासा उशीर झाला तर त्याच्या आईची चलबिचल वाढते, उशीर का झाला याची कारणे शोधताना नकळत नकारात्मक बाबी अगोदर तिच्या मनात येतात, रिक्षा/गाडी पंक्चर झाली असेल का? येथून सुरुवात होऊन नको त्या नकारात्मक बाबीकडे तिचे मन ओढले जाते... दुसरे मन तिला समजविण्याचा प्रयत्न करते असे काही झाले नसणार, येईलच तो एवढ्यात वगैरे. अशाच काही घटना असतील, ज्यात नकारात्मक बाबीकडे एक मन जास्त प्रमाणात आपणास ओढते.
अशीच परिस्थिती आपली वर्तमानसमयी झाली आहे. कोरोना विषाणू विध्वसंक आहे, परंतु त्यापेक्षाही जास्त विध्वंसक आपण त्याला नकारात्मकतेच्या रूपाने आपल्या मनात आणून ठेवले आहे. त्यापासून वाचण्यासाठी शासन, प्रशासनाने दिलेले सर्व नियम आपण पाळतोच. परंतु ,छोट्या छोट्या नकारात्मक बाजूकडे आपण जास्त प्रमाणात ओढले जातो. साधी सर्दी, छोटा खोकला झाला की, लगेच मनात अनेक नकारात्मक बाबी घर करण्यास सुरुवात करतात.
आपण सकारात्मकता दृढ केल्यास निश्चितपणे जे दुसरे मन नकारात्मक चिंतन करते, त्यास बंद करून सशक्त मन करू शकतो. संशोधनाअंती सकारात्मक चिंतनाने शरीराची रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते असे सिद्ध झाले आहे. तेव्हा मनाच्या अगाध शक्तीला ओळखा, उच्च सकारात्मक विचारासाठी योगासने, प्राणायाम, राजयोग अभ्यास, व्यायाम आदी केल्यास निश्चित मन सदृढ होईल.
निरुपण : ब्रह्माकुमारी मीनाक्षीदीदी, उपक्षेत्र संचालिका,
ब्रह्माकुमारीज,जळगाव