जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे...
जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, या अभंगावरून असे दिसते की, आपल्या महाराष्ट्रात वारकरी संप्रदायातील संत निष्काम कर्म करणारे आहेत. स्वतःला काही नको, जगाच्या कल्याणाची त्यांच्या जीवनाचा प्रत्येक क्षण त्यांनी विचार केला आहे.
सामान्य माणसापासून त्यांच्या उद्धाराची तळमळ त्यांच्या अंगी आहे. वारकरी भागवत धर्म जोपासणारे संत निवृत्ती महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपान देव काका, संत एकनाथ, संत तुकाराम, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत मीरा, संत गोरा कुंभार, संत सावता माळी, संत नरहरी सोनार, संत जोगा परमानंद, संत सेना न्हावी, संत सच्चिदानंद बाबा, संत कान्होपात्रा, संत परिस भागवत, संत चोखामेळा, संत कबीर दास, संत विठोबा राय, संत जोग महाराज, मामासाहेब दांडेकर, संत झेंडूजी महाराज, असे ज्ञानवंत प्रतिभावान संत होऊन गेले.
त्यांना त्यांच्या भक्तितत्त्वाचा किंवा त्यांच्या प्रतिभेचे प्रदर्शन नव्हते करायचे. त्यांनी समता, ममता व सर्व आबालवृद्ध लोकांचे कल्याण आणि उद्धारासाठी भगवतभक्ती नामसंकीर्तन आधारले. त्यांना भागवत धर्म जोपासायचा होता, त्यांनी भागवत धर्माचे वेद, उपनिषद, गीता, १८ पुराणे यातून भागवत धर्माचा प्रसार केला. भागवत धर्माचे मूळ वैदिक पौराणिक परंपरेत आहे. जसे जीव शिव आहे, तसेच भागवत धर्म म्हणजे भक्तिमार्ग आहे. हे आचरणात आणणारे संत हे तत्त्वज्ञान भागवत धर्माचे मुख्य दैवत विठ्ठल परब्रह्म आहे. वारकऱ्यांचे भगवान पंढरपुरातील कडेवर हात ठेवून, उभा असेलला स्वयंभू शाश्वत विश्वरूप तेच परमेश्वराचे आणि सर्वांचे यथार्थ स्वरूप आहे. या विश्वालाच विठ्ठलाचे प्रत्यक्ष दर्शन होय, असे संतांनी सांगितले आहे. विश्व सेवा म्हणजे विठ्ठलाची भक्ती ‘हे विश्वची माझे घर’ ही कल्पना यातून उगम पावते, हेच वरील संतांचे समाजप्रबोधन आहे. संतांनी भोळ्याभाबड्या जनतेची धार्मिक, अंधविश्वास, अंधश्रद्धा, प्रतिमा पूजा आणि चमत्कार, अशा दंत कथांमधून सोडवणूक करून जनतेला यथार्थ भक्ती (विश्वास) श्रद्धा यांची शिकवण दिली. संतांनी अनुभवाचे अधिष्ठान आश्वासन दिले आहे. सर्वधर्मसमभावाचे तत्त्व भागवत धर्मीय संतांनी जोपासले आहे.
निरूपण : ह.भ.प. गोपाळ महाराज ढाके