लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील क्रीडा संकुलांमध्ये सरावासाठी वेगवेगळे शुल्क आहे. तसेच फिरायला येणाऱ्यांसाठी आणि खेळाडूंसाठी समान शुल्क आहे. त्यामुळे सर्व क्रीडा संकुलांमध्ये समान शुल्क करावे आणि राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय खेळाडूंना शुल्क माफ करावे, या मागणीसाठी संपूर्ण राज्यातील क्रीडा कार्यकर्ते, प्रशिक्षक आणि संघटक एकवटले आहे. त्यांनी क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांची भेटदेखील घेतली. त्यानुसार जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश लवकर देऊ, असे आश्वासन बकोरिया यांनी शिष्टमंडळाला दिले, अशी माहिती राजेश जाधव यांनी दिली.
क्रीडा आयुक्त यांच्यासोबत बालेवाडी, पुणे येथे अमरावती शारीरिक शिक्षण महामंडळ व राज्य क्रीडाशिक्षक महासंघ, अहमदनगर या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत नुकतीच बैठक पार पडली. मैदाने व कोर्ट वापराच्या वाढीव शुल्क आकारणी संदर्भात व खेळाडू व्यतिरिक्त इतरांना आरक्षित करण्यात आलेल्या मैदानावरील वेळेबाबत तसेच फीट इंडिया उपक्रमाच्या यशस्वी आयोजन व वाढीव कार्यभार, बीपीएड-एमपीएड-एनआयएस बेरोजगार युवकांना क्रीडा प्रशिक्षक नियुक्ती देणे ,खेळाडू शिष्यवृत्तीतील वाढ, पंच मानधन, खेळाडू अपघात विमा, खेळाडू दैनिक भत्त्यात वाढ, ग्रामीण क्रीडा स्पर्धा पुन्हा सुरू करणे, क्रीडा परिषदेवर शिक्षक व संघटना प्रतिनिधी घेण्यात यावे, या मागण्या महासंघाने मांडल्या.
आठवीपर्यंतच्या खेळाडूंना मैदानावरील प्रवेश शुल्क व फी माफी अंमलबजावणी बाबत महासंघाने बाजू मांडली. खेळाडूंसाठी मैदाने खुली करण्यासंदर्भात दिरंगाई होत असून, लवकरात लवकर मैदाने खुली करावीत या बाबत संबंधितांना निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली. बैठकीत सर्व मागण्यांबाबत सविस्तर चर्चा होऊन कार्यवाही करण्याबाबतचे निर्देश आयुक्तांनी दिले.
फीट इंडियाअंतर्गत शाळांच्या नोंदणीची मुदत वाढविण्यात आली असून, सर्व शाळांनी नोंदणी करण्याचे आवाहन क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी केले.
जळगाव जिल्ह्यातून या मागणीसाठी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त डॉ. प्रदीप तळवेलकर, प्रशांत जगताप, प्रवीण पाटील, प्रवीण कोल्हे हे आग्रही होते.