अजय पाटील
जळगाव : गंगा, ब्रह्मपुत्रा या नद्यांमध्ये आढळणाऱ्या ‘स्पॉटेड सेल बार्ब’ या माशाची जिल्ह्यातील वाघूर धरणात नोंद झाली आहे. वन्यजीव संरक्षण संस्थेच्या मत्स्य अभ्यासकांनी ही नोंद केली आहे. ‘टॅप्रोबॅनिका’ या इंडोनेशियाच्या आंतरराष्ट्रीय पत्रिकेत या अभ्यासकांचा शोध निबंध प्रसिद्ध झाला आहे. वन्यजीव संस्थेचे मत्स्य अभ्यासक गौरव शिंदे यांच्या पुढाकाराने बाळकृष्ण देवरे आणि कल्पेश तायडे यांनी ‘शोध गोड्या पाण्यातील माशांचा’ याद्वारे ३४ प्रजातींची नोंद घेतली आहे. त्यात ‘स्पॉटेड सेल बार्ब हा महाराष्ट्रात प्रथमच दिसला आहे.
२०२१ मध्ये झाली होती नोंद ‘स्पॉटेड सेल बार्ब’चा शोध बंगालच्या ईशान्य भागातून हॅमिल्टनने १८२२ मध्ये लावला. अगोदर हा मासा फक्त गंगा आणि ब्रह्मपुत्रा व त्यांच्या उपनद्यांमध्येच आढळायचा. २०१५ मध्ये हा मासा तामिळनाडूमध्ये मिळाल्याची नोंद आहे. वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये जिल्ह्यातील वाघूर धरण बॅक वॉटरमध्ये या माशाला शोधून काढले.
काय आहेत वैशिष्ट्ये? अभ्यासक गौरव शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार या माशांचे खोल शरीर, शंकूच्या आकाराचे डोके, पंख फिकट नारिंगी असतात. नरांमध्ये हा रंग थोडा गडद असतो. लांबी साधारण ३.५ सेंटिमीटर असते. तापी व तिच्या उपनद्यांमध्ये गेल्या चार वर्षांपासून जलीय जीवन जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात हा मासा वाघूर धरणातील जलीय वनस्पतींमध्ये आढळून आला.
खान्देशातील जलाशयांवर स्थानिक माशांच्या प्रजातींच्या अधिवासावर तीलापिया, मांगुर, सकरसारख्या परदेशी मत्स्य प्रजातींचे अतिक्रमण बघता स्थानिक माशांच्या संवर्धनाची गरज आहे. नदीपात्रात अवैध वाळू उपसादेखील जलीय परिसंस्था धोक्यात आणत आहे. - बाळकृष्ण देवरे, अध्यक्ष, वन्यजीव संरक्षण संस्था