लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिका व जिल्हा प्रशासनाकडून कोरोना रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा न राबविता लॉकडाऊन व जनता कर्फ्यू अशा पर्यायांवर महापालिकेकडून काम केले जात आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात जी प्रभावी यंत्रणा महापालिका प्रशासनाने राबवली होती, ती यंत्रणा या टप्प्यात राबविताना महापालिका प्रशासन दिसून येत नाही. फवारणी तसेच रुग्ण शोधमोहीम देखील केवळ नावालाच ठरत आहे.
जळगाव शहरात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या दिवसाला २०० च्या सरासरीने वाढत आहे. विशेष म्हणजे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना देखील मनपा प्रशासनाने रुग्ण शोधमोहीम, रुग्णांच्या संपर्कातील आलेल्या नागरिकांचा शोध घेणे, प्रतिबंधित क्षेत्रात अधिक लक्ष घालणे अशी प्रभावी यंत्रणा राबविल्यामुळे कोरोना काही प्रमाणात आटोक्यात आणण्यात महापालिकेला यश आले होते. मात्र, महापालिकेकडे तीच यंत्रणा असतानादेखील यावेळेस महापालिका प्रशासन काहीअंशी अपयशी ठरताना दिसून येत आहे.
प्रतिबंधित क्षेत्रात घेतली जात नाही खबरदारी
फेब्रुवारी महिन्यात रुग्णांची संख्या वाढल्यानंतर महापालिका प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्राबाबत सुरुवातीला गांभीर्याने घेतले नाही. एखाद्या भागात लग्न आढळल्यानंतर केवळ संबंधित रुग्णाचे घर सील करण्यात आले होते. अनेक दिवस हीच प्रक्रिया महापालिकेने राबवली. रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर देखील अजूनही महापालिका प्रशासनाकडून प्रतिबंधित क्षेत्रात आवश्यक ती खबरदारी घेतली जात नसल्याचे पाहावयास मिळत आहे.
रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेण्यास मनपाला अपयश आले आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्हाभर रुग्ण शोधमोहीम राबविली आहे. या मोहिमेची अंमलबजावणी शहरात होताना फारसे दिसून येत नाही. महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ९७ जणांची तपासणी करण्यात आली आहे.
रुग्णाकडून मागणी केल्यावरदेखील केली जात नाही फवारणी
१. शहरात औषध फवारणीचे कामदेखील धिम्या गतीने सुरू आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील गल्लोगल्लींमध्ये फवारणी करण्यात आली होती. मात्र, या टप्प्यात रुग्णसंख्या वाढली असताना देखील अनेक भागांमध्ये अद्यापही फवारणी करण्यात आलेले नाही.
२. यासह गृह विलगीकरणासाठी महापालिका प्रशासनाने कडक नियम लागू केले आहेत. मात्र, संबंधित रुग्ण घरी गेल्यानंतर त्याच्याकडे देखील महापालिकेकडून फारसे लक्ष ठेवले जात नाही. त्यामुळे कोरोनाचा फैलाव देखील मोठ्या प्रमाणात होत आहे.
कोट
महापालिका प्रशासनाकडून रुग्ण आढळल्यानंतर संबंधित भागात तत्काळ औषध फवारणी केली जात असते. तसेच मलेरिया विभागाकडून देखील यासाठी काही कर्मचाऱ्यांची नियुक्तीदेखील करण्यात आली आहे.
- पवन पाटील, आरोग्य अधिकारी मनपा