जळगाव : कोरोनाचा संसर्ग पुन्हा वेगाने वाढत आहे. या संसर्गाला रोखण्यासाठी आता ज्या भागात बाधित रुग्ण आढळून येणार त्या भागात महानगरपालिकेच्या मलेरिया विभागाद्वारे सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात येणार आहे.
मागील वर्षी कोरोना विषाणूने शहरात अक्षरश: थैमान घातले होते. या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी महानगरपालिकेच्या मलेरिया विभागाद्वारे शहरातील ज्या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेले आहेत, अशा ठिकाणी सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात आली होती. दरम्यान, मध्यंतरी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. त्यादृष्टीने उपाययोजना म्हणून व कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी पुन्हा आता ज्या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येईल, त्या भागात मलेरिया विभागातर्फे फवारणी केली जाणार आहे. तसेच आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील, नगरसचिव व आरोग्य पर्यवेक्षक यांच्या दैनंदिन फवारणी करण्याबाबत नियोजन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
तात्काळ कर्मचारी उपलब्ध करून द्या
प्रमुख वैद्यकीय अधिकारी यांनी कोरोना रुग्णांची दैनंदिन यादी व प्रभाग अधिकारी यांनी कंन्टेंटमेंट झोनची यादी त्याच दिवशी मलेरिया विभागाकडे द्यावी, अशा सूचना आयुक्तांनी केल्या आहेत. तसेच फवारणीसाठी लागणारे सोडियम हायपोक्लोराईड याचा आवश्यक साठा हा मलेरिया विभागाच्या मागणीप्रमाणे पुरवठा करण्याबाबतही भांडार विभागाला सूचित केले असून फवारणीसाठी कर्मचाऱ्यांची कमतरता भासल्यास सहाय्यक आयुक्तांनी तात्काळ कर्मचारी उपलब्ध करून देण्याचेही आदेश आयुक्त यांनी केले आहेत.