जळगाव - तालुक्यातील आव्हाणे गावात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून, मंगळवारी एकाच कुटुंबातील ३ जण बाधीत झाले होते. त्यानंतर बुधवारी देखील २ जण कोरोना बाधित झाले आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. आव्हाणे गावात याआधी १८९ जण बाधित झाले होते. यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे.
रोटरी सेंट्रलतर्फे लेसर उपचार शिबिर
जळगाव - येथील रोटरी क्लब ऑफ जळगांव सेंट्रल तर्फे रविवारी टागोरनगर समोरील भास्कर मार्केट जवळ शिल्प कॉस्मेटिक क्लिनिक येथे मोफत लेसर उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात डॉ.शुभा महाजन या रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन करणार आहेत. जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी या शिबिराचा फायदा घ्यावा, असे आवाहन मानद सचिव जितेंद्र बरडे, मेडिकल कमेटी चेअरमन डॉ. अनंत पाटील यांनी केले आहे.
उपमहापौरांचा आज जनता दरबार
जळगाव - उपमहापौर सुनील खडके यांनी सुरू केलेल्या ‘जनता दरबार’ उपक्रमांतर्गत गुरुवारी सकाळी ११ वाजता मनपाच्या आवारात शेवटच्या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत ३७३ तक्रारी मार्गी लागल्या आहेत. काही तक्रारी यात तांत्रिक त्रुटी असल्याने त्या सोडवण्याचा प्रयत्न सुध्दा चालू आहेत. जनता दरबारात येऊन नागरिकांनी आपल्या समस्या मांडाव्या, असे आवाहन उपमहापौरांकडून करण्यात आले आहे.
पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम
जळगाव - जन संघाचे नेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या स्मृतीदिनानिमित्त गुरुवारी सकाळी १० वाजता जिल्हा महानगरातील ९ मंडलामध्ये त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा अध्यक्ष सुरेश भोळे, महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तापमानात वाढ होणार
जळगाव - गेल्या काही दिवसांपासून तापमानात घट झाल्याने जळगावकरांना गुलाबी थंडीचा अनुभव लाभत होता. मात्र, येत्या दोन दिवसात तापमानात वाढ होण्याची शक्यता असून, उन्हाळ्याची चाहुल आता लागणार आहे. बुधवारी कमाल तापमानात वाढ झाली होती. पारा ३२ अंशावर पोहचल्याने काही अंशी उन्हाचा चटका देखील जाणवत होता.