लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव- मनपा प्रशासनाने शहरातील मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांकडे असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी पुन्हा कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. यावेळेस आता मनपा प्रशासनाने अव्यावसायिक मार्केटमधील गाळे ताब्यात घेण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्या असून, त्याविरोधात गाळेधारक संघटना पुन्हा आंदोलनाच्या तयारीत आहे. मनपाने कारवाई सुरू केल्यास त्याविरोधात कुटुंबीयांसह आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांनी दिला आहे.
सोमवारी महापालिकेत झालेल्या मनपा अधिकाऱ्यांच्या बैठकीत गाळेधारकांना कडून थकीत भाडे वसूल करण्यासंदर्भात धोरण निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच मोठ्या मार्केट सह अव्यावसायिक मार्केटमधील गाळेधारकांनी वर देखील कारवाई करण्याची तयारी आता मनपा प्रशासनाने सुरू केली आहे. त्यामुळे संतापलेल्या गाळेधारकांना कडून पुन्हा आंदोलनाचे शस्त्र बाहेर काढले जाण्याची शक्यता आहे. मनपा प्रशासनाने अजूनही महासभेने घेतलेल्या ठरावाची प्रत गाळेधारकांना दिली नसून, त्यावर अभ्यास केल्यानंतरच गाळेधारक आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. मात्र त्याआधीच मनपा प्रशासन कारवाईच्या मूडमध्ये असल्याने गाळेधारक देखील आक्रमक झाले आहेत. मनपा प्रशासनाने अव्यावसायिक मार्केटमधील गाळेधारकांसाठी धोरण निश्चित करणे गरजेचे असताना देखील मनपा यावर कोणतीही भूमिका स्पष्ट करताना दिसून येत नाही. त्यामुळे गाळेधारकांना वर कारवाई केल्यास सर्व गाळेधारक आपल्या मुलाबाळांसह रस्त्यावर उतरतील असा इशारा देखील आता गाळेधारक संघटनेकडून देण्यात आला आहे. यासंदर्भात बुधवारी गाळेधारक संघटनेचे पदाधिकारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देखील भेटणार असल्याची माहिती डॉ. शांताराम सोनवणे यांनी दिली आहे.
गरीबांवर अन्याय करून मिळणार तरी काय ?
शहरातील १६ अव्यावसायिक मार्केटमधील गाळेधारकांचा व्यवसाय हा आधीच होत नाही. त्यात गेला वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे व्यवसाय ठप्प आहेत. अशा परिस्थितीत महापालिकेने कोणतेही मूल्यांकन न करता या मार्केटमधील गाळेधारकांना अवाजवी स्वरूपातील भाड्याची बिले अदा केली आहेत. त्या बिलांची रक्कम १६ मार्केटमधील गाळेधारकांना भरणे शक्यच नाही. याबाबत नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट देखील गाळेधारक घेणार आहेत. तसेच हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील गाळेधारकांना आश्वासन दिले आहे. मात्र ही बैठक होण्याअगोदरच मनपा प्रशासन कारवाईचा इशारा गाळेधारकांना देत आहे. अनेक मार्केटमधील गाळेधारकांची कडे देखील मोठी रक्कम थकीत आहे. त्यांच्याकडून वसूल न करता गरीब गाळेधारकांवर मनपा प्रशासन एक प्रकारे अन्यायच करत असल्याचा आरोप गाळेधारक संघटनेकडून करण्यात आला आहे. शहरात मनपाच्या अनेक कोट्यवधीच्या जागा अनेक वर्षांपासून धूळ खात पडलेला आहेत त्या ताब्यात न घेता केवळ गाळेधारकांवरच कारवाईचा इशारा देऊन मनपा प्रशासन अन्याय करत असल्याचा आरोप गाळेधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन बुधवारी गाळेधारक आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती डॉ. शांताराम सोनवणे यांनी दिली आहे.