जळगाव : काही मार्गावरील रस्ते चांगले असले, तरी बहुतांश ग्रामीण भागातील रस्त्यांची मात्र आजही दुरवस्था आहे. या रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे बसेस पंक्चर होण्याचे प्रमाण वाढले असून, इतर तांत्रिक कारणांमुळेही रस्त्यात बसेस बंद पडण्याचे प्रकार घडत आहेत. गेल्या दोन वर्षांत जळगाव आगारातील २०० बसेस रस्त्याच्या मध्येच बंद पडल्याचे प्रकार घडले असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या जळगाव आगारातून दिवसभर बसेसची वाहतूक सुरू असते. राज्यासह परराज्यातही बसेस धावत असतात. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कार्यशाळेत वेळोवेळी बसेसचे दुरूस्तीचे काम केले जाते. बसेसची सर्व प्रकारची तपासणी करुनच बाहेरगावी बसेस रवाना होतात. असे असले तरी रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे गेल्या दोन वर्षांत जळगाव आगारातील अनेक बसेस रस्त्यात पंक्चर झाल्याच्या घटना घडल्या. यामध्ये जळगाव- औरंगाबाद, जळगाव-चाळीसगाव व जळगाव-धुळे या मार्गांवर रस्त्यांचे काम सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर महामंडळाच्या बसेसचे नुकसान झाले. यामध्ये बसेसच्या टायरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
विशेष म्हणजे रस्त्यांचे काम सुरू असतांना, अनेकदा बस पंक्चर झाल्याचे प्रकार झाले. बस पंक्चर किंवा तांत्रिक कारणामुळे बंद पडल्यावर आगार प्रशासनातर्फे तात्काळ त्या मार्गावरील दुसऱ्या गाडीत किंवा जवळच्या आगारातून दुसरी बस पाठवून प्रवाशांची पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे.
इन्फो :
रस्त्यात बस पंक्चर किंवा तांत्रिक कारणामुळे बस बंद पडल्यावर प्रवाशांना त्या मार्गावरील दुसऱ्यामध्ये बसविण्यात येते. तसेच शक्य झाले तर त्या मार्गावरील जवळच्या आगारातून दुसरी बस पाठवून प्रवाशांची पर्यायी व्यवस्था करण्यात येते. मात्र, आता रस्त्यात बसेस बंद पडण्याचे प्रमाण खुपच कमी आहे.
प्रज्ञेश बोरसे, आगार व्यवस्थापक, जळगाव आगार
इन्फो:
रस्त्यात बस बंद पडण्याची ही आहेत कारणे
महामंडळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार रस्त्यामध्ये कधी ब्रेक डाऊन झाल्यामुळे बस बंद पडते किंवा टायर पंक्चर झाल्यामुळे बंद पडत असल्याचे सांगण्यात आले. कधी-कधी अचानक इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्यावरही बस बंद पडत आहेत. तसेच जर बस बंद पडली तर तात्काळ दुसऱ्या जवळच्या आगारातून बस उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले.
इन्फो :
दहा वर्षांवरील मोजक्याच बसेस
सध्या महामंडळाच्या जळगाव विभागाकडे सव्वा सातशेच्या घरात बसेस आहेत. या मध्ये बोटावर मोजण्या इतक्याच दहा वर्षापेक्षा जास्त वयोमान असलेल्या बसेस आहेत. तर बहुतांश बसेस या १ ते ८ वर्षांच्या वयोमान दरम्यानच्या आहेत. जिल्ह्यातील आगारांमध्ये जास्तीत-जास्त १२ वर्षापर्यंत बसेसचा वापर केला जात असून, १२ वर्षापुढील बसेस या स्क्रॅपमध्ये काढल्या जात असल्याचे सांगण्यात आले.
----
इन्फो ::
जिल्ह्यातील एसटी बसेस ७२५
इन्फो :
एसटीच्या देखभाल दुरुस्तीसाठी वर्षाला १२ कोटी खर्च
जळगाव विभागातील सर्व आगार मिळून एसटी बसेसच्या मेन्टेंन्ससाठी वर्षाला १२ कोटींच्या घरात खर्च येत आहे. महामंडळाच्या उत्पन्नाचा बराचसा पैसा मेन्टेंन्सवर खर्च होत आहे. यात वर्षाला सर्वाधिक दोन लाखांचा खर्च टायरवर होत आहे. तसेच इंजिन दुरूस्ती, गियर बॉक्स, अपघातग्रस्त वाहनाची दुरूस्ती, दारे-खिड्यांची दुरूस्ती आदी विविध प्रकारच्या ३० ते ३५ सेक्शनच्या माध्यमातुन कार्यशाळेत बसेसच्या मेन्टेंन्सवर वर्षाला १२ कोटींच्या घरात खर्च होत आहे.