- प्रसाद धर्माधिकारी जळगाव - संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना ७५ वर्षांनंतर प्रथमच सोमवारपासून निमगाव ग्रामस्थांच्या सेवेत एस. टी. बस धावू लागल्याने निमगाव ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
जळगावपासून अवघ्या सहा किलोमीटरवर तर बेळीपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर निमगाव आहे. बेळी गावापर्यंत एस. टी.ची सेवा सुरू आहे. मात्र, रस्त्याअभावी निमगावला बसची सुविधा नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तर मजुरांना रोजीरोटीसाठी पायपीट करावी लागत होती. दरम्यान, माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निधीतून गावापर्यंत नुकताच डांबरी रस्ता झाला आहे. त्यानंतर आता स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सोमवारी गावात एस. टी. बसचे आगमन झाले.
या बसचे स्वागत करण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, सरपंच प्रियंका पाटील, उपसरपंच महेंद्र मगरे, रवींद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य विनोद पाटील, हेमराज पाटील, प्रमोद राजपूत, अशोक पाटील, आत्माराम धनगर, विलास पाटील, मुकेश पाटील, दिनकर पाटील, सोपान पाटील, अरुण पाटील, अवचित धनगर, रवींद्र पाटील, रवींद्र धनगर, रघुनाथ महाजन, गणेश पाचपांडे यांच्यासह शालेय विद्यार्थी उपस्थित होते. निमगावात बसचे आगमन होताच सर्वांनी आनंद व्यक्त केला. यावेळी वाहक व चालक यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर ५० विद्यार्थांनी लालपरीतून प्रवास करत जळगाव गाठले.