जळगाव : अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे शनिवारी रात्री दीड वाजता एसटी बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत बस पूर्ण जळून खाक झाली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पावसाचे वातावरण असल्याने चालक आणि वाहक हे एसटीपासून दूर असल्याने थोडक्यात बचावले आहे.
अमळनेरहून मांडळ येथे जाणारी बस रात्री साडे नऊ वाजता मांडळ येथे पोहचते. शुक्रवारी नेहमीप्रमाणे बस क्र. एम एच १४ बी टि ४१९ ही रात्री साडे नऊला मांडळला पोहचली होती. चालक व वाहक बसमध्ये किंवा टपावर झोपतात. मात्र पाऊस असल्याने चालक सुशील हिरालाल चव्हाण व वाहक शरद गव्हाणे हे गावाबाहेरील गावदरवाज्याशेजारी झोपले होते रात्री सुमारे दीड वाजता एसटीला आग लागल्याची घटना समोर आली.
चालक व वाहक बाहेर असल्याने ते बचावले आहेत. गावकऱ्यांनी मिळेल त्या साधनांनी आग विझवण्यास सुरुवात केली. अग्निशामक दलाची गाडी बोलावण्यात आली होती मात्र तोपर्यंत आग विझवण्यास गावकऱ्यांना यश आले. मात्र या भीषण आगीत बसचा आतील भाग पूर्णपणे जळाला आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. एसटी पेटली की पेटवली याबाबत अद्याप संशय असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.