डाक विभागातर्फे ४ मार्च रोजी डाक अदालत
जळगाव : पोस्टासंबंधी ज्या नागरिकांच्या तक्रारी व समस्या असतील, अशा नागरिकांसाठी डाक विभागातर्फे ४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता टेलीफोन ऑफीसजवळील मुख्य डाक कार्यालयात डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी २६ फेब्रुवारीपर्यंत जळगावातील मुख्य डाक कार्यालयात पोस्टाने तक्रारी पाठविण्याचे आवाहन डाक विभागातर्फे करण्यात आले आहे.
एसटी कामगार सेनेच्या अध्यक्षपदी गणेश पाटील
जळगाव : महाराष्ट्र एसटी कामगार सेनेची यंदाची आगार कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली असून, अध्यक्षपदी गणेश पाटील यांची निवड करण्यात आली आह.तसेच कार्याध्यक्षपदी किशोर पाटील, उपाध्यक्ष सुनील विसावे, रामचंद्र सोनवणे, सचिव निंबा महाजन, प्रभाकर सोनवणे, सहसचिव शिवाजी पाटील, जयवंत अहिरे, अनिल बारी, खजिनदार एकनाथ सपकाळे तर सदस्यपदी गोपाळ पाटील, बाळू हटकर, मोहिनी बर्गे, बिजली नेतलेकर, बापू हटकर यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र एक्सप्रेसची वेळ बदलण्याची मागणी
जळगाव : रेल्वे प्रशासनाने गेल्या काही महिन्यांपासून डाऊनच्या महाराष्ट्र एक्सप्रेसची वेळ बदलविल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने या गाडीची वेळ पूर्वीप्रमाणेच ठेवावी, अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
विनामास्क प्रवाशांवर कारवाईची मागणी
जळगाव : बसमध्ये प्रवाशांना मास्क वापरण्याची सक्ती करण्यात आली असली तरी, अनेक प्रवासी विनामास्क प्रवास करत आहेत. तरी अशा प्रवाशांवर आगार प्रशासनाने दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.