भूषण श्रीखंडे
जळगाव : बस स्थानकात विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांच्या भरगच्च गर्दीने भरलेली एसटी बस भर उन्हात तब्बल तीन तास उभी असल्याचा प्रकार घडला. या प्रकारामुळे बसमधील ताटकळत उभे असलेल्या विद्यार्थ्यांनी अखेर भाजपाचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांना फोन लावून बस स्थानकात बोलावून घेतले. जळकेकर महाराज यांनी बस स्थानक प्रमुख यांना बस का सोडत नाही? ज्येष्ठ नागरिकांची तब्येत बिघडली तर अशा प्रश्नांची विचारणा केली. यावर बस स्थानक प्रमुखांनी उर्मट भाषेत आमची जबाबदारी नसल्याचे सांगितले आणि हा वाद जळगाव एसटी विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांच्याकडे गेला.
जळगाव बस स्थानकात दुपारी बारा वाजता जळगाव-बांबरुड ही गाडी लागली. एक वाजता ती सुटण्याची वेळ असताना तीन वाजले तरी ही बस निघत नसल्याने बसमधील विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांनी एसटी कर्मचाऱ्यांना विचारणा केली. परंतु बस स्थानकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थित उत्तर मिळत नसल्याने अखेर विद्यार्थ्यांनी भाजपाचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष जळकेकर महाराज यांना बोलावून घेतले. त्यांनी बस स्थानक प्रमुख यांना फोनवर संपर्क साधला असता नंतर येतो, कामात आहे असे उत्तर दिले. त्यामुळे शाब्दिक वाद झाला. त्यानंतर तीन तासानंतर बसस्थानकातून बस बांबरुडला रवाना झाली.
विभाग नियंत्रकांकडे केली तक्रार
भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांनी जळगाव एसटी विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतली. यावेळी दूध संघ संचालक अरविंद देशमुख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जगनोर यांनी जळगाव बस स्थानक प्रमुखांची उर्मट भाषेबद्दल तक्रार केली. तसेच ग्रामीण भागातील बसफेऱ्या करणाऱ्या गाड्या शाळेजवळ थांबत नाहीत तसेच बसचालक व वाहकांच्या तक्रारी करण्यात आल्या. जगनोर यांनी तक्रारी ऐकून बस फेऱ्यांबाबत पुन्हा नियोजन करून शाळेच्या वेळेत बस सोडण्याबाबत आश्वासन दिले.