नांदेड आणि गंगानगर विशेष गाडी
जळगाव : रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी हजूर साहिब नांदेड आणि श्री गंगानगर / हजरत निजामुद्दीनदरम्यान रेल्वे प्रशासनातर्फे विशेष गाडी चालविण्यात येणार आहे. १ एप्रिलपासून ही गाडी दर गुरुवारी व परतीसाठी दर शनिवारी धावणार आहे. या गाडीला जळगाव रेल्वे स्टेशनवर थांबा देण्यात आला आहे.
सेवाग्राम एक्स्प्रेसला जादा डबे जोडण्याची मागणी
जळगाव : जळगाव- मुंबईकडे जाणाऱ्या पहाटेच्या सेवाग्राम एक्स्प्रेसला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र, जनरल डब्यांना प्रचंड गर्दी असल्यामुळे अनेक प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने या गाडीला जादा डबे जोडण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
स्टेशनवरील नळातून पाण्याची गळती
जळगाव : रेल्वे स्टेशनवर बसविण्यात आलेल्या अनेक ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याच्या तोट्या खराब झाल्यामुळे त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत आहे. ऐन उन्हाळ्यात पाण्याची नासाडी होत असल्यामुळे, रेल्वे प्रशासनाने या नळांची दुरुस्ती करण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
उद्घाटनापूर्वीच दादऱ्यावरून वापर सुरू
जळगाव : रेल्वे स्टेशनवर दादरा उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, कोरोनामुळे उद्घाटनाचे काम रखडले आहे; परंतु प्रवाशांनी उद्घाटनापूर्वीच दादऱ्यावरून वापर सुरू केला आहे. स्टेशनच्या आत-बाहेर अनेक प्रवासी या दादऱ्याचा व सरकत्या जिन्यांचा वापर करत आहेत.