जळगाव - राज्यात गेल्या 5 महिन्यांपासून थाबंलेल्या लाल परीची चाके आता पुन्हा रस्त्यावर धावू लागले आहेत. उच्च न्यायालयाने एसटी संपातील कर्मचाऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर हजर राहण्याच्या सूचना दिल्यानंतर आता बहुतांश कर्मचारी कामावर परत येत आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्यानंतर कामगारांचे वकिल अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर, कामगारांनी आपला मोर्चा आता डेपोकडे वळल्याचे दिसून येत आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा आगारात 70 टक्के कर्मचारी कामावर हजर झाले आहेत.
राज्यातील एसटी कामगारांनी विलगीकरणाच्या मुदद्यावरुन दीर्घकाळ संप पुकारला होता. या संपामुळे कर्माचाऱ्यांचे, सर्वसामान्यांचे, व्यापाऱ्यांचे आणि एसटी महामंडळाचे मोठे नुकसान झाले. तब्बल 5 महिन्यांपर्यंत या संपाची झळ राज्यातील जनतेलाही बसली. अखेर, हायकोर्टाच्या आदेशानंतर वस्तूस्थिती ओळखून आता कर्मचारी परत फिरले आहेत. राज्यातील बहुतांश डेपोतील कामगार-कर्मचारी आता लाल परीच्या सेवेत दाखल झाले आहेत. एकीकडे भरकटलेला संप आणि दुसरीकडे न्यायालयाचा आदेश, या दोन्हींकडे पाहता कामगार पुन्हा आपली खाकी चढवून जाऊ दे रे गाडी.... असं म्हणताना दिसत आहे.
ऐन दिवाळीत राज्यातील बहुतांश एसटी आगारात बसची चाके थांबली होती. कालांतराने काही कर्मचारी हजर झाल्याने राज्याची लालपरी रस्त्यावर धावू लागली. आता उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर चोपडा आगारात 368 पैकी 229 म्हणजेच जवळपास 70 टक्के कर्मचारी हजर झाले असून 17,000 किलोमीटर एसटीच्या फेऱ्या सुरू झाल्याची माहिती, चोपडा आगार व्यवस्थापक संदेश क्षीरसागर यांनी दिली. सध्या लांब पल्ल्याच्या, मध्यम पल्ला आँर्डेनरीच्याही फेऱ्या सुरू आहेत. लवकरच ग्रामीण भागात फेऱ्या सुरू करू. तसेच, विद्यार्थ्यांच्या फेऱ्या, ग्रामीण भागाचे मुक्काम आणि सर्व फेऱ्या 22 तारखेच्या आत सुरू करणार असल्याचेही क्षीरसागर यांनी सांगितले.