अचानक तपासणी : मूळ कागदपत्र २५ मेपर्यंत उपलब्ध करून देण्याच्या सूचना
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : बोगस शिक्षक भरतीप्रकरणी मान्यतेच्या प्रस्तावांची नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण कार्यालयात अचानक जाऊन तपासणी केली. यावेळी अनेक शिक्षकांच्या मूळ संचिका उपलब्ध नसताना त्यांचे पगार सुरू आहेत, त्यांची पडताळणी करण्यासाठी या मूळसंचिका उपलब्ध करण्याचे निर्देश संचालकांनी दिले होते, मात्र ते अद्याप तयार न केल्याने शिक्षण विभागातील चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली. यासह चौकशीसाठीचे सर्व आवश्यक कागदपत्रे २५ मेपर्यंत उपलब्ध करून देण्याची मुदत देण्यात आली असल्याची माहिती उपसंचालक नितीन उपासनी 'लोकमत'ला दिली.
विधान परिषदेमध्ये जळगाव जिल्ह्यातील काही संस्थांमधील नोकरभरती विषयी प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकाराच्या चौकशीला सुरुवात झाली होती. तत्कालीन शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांच्या काळात मान्यता देण्यात आल्या होत्या. यामुळे या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यासंबंधी आवश्यक कागदपत्रं उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या होत्या. वारंवार सांगून सुद्धा कागदपत्र उपलब्ध होत नव्हती. अखेर आवश्यक कागदपत्रे तपासणीसाठी मंगळवारी उपासनी यांनी जळगाव जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाला अचानक भेट दिली.
मूळसंचिकाच तयार केलेल्या नाहीत....
शिक्षण विभागातून शिक्षकांच्या मूळसंचिका उपलब्ध होत नाहीत, ऑर्डर नाहीत, शालार्थ आयडी नाहीत, मात्र पगार बिले निघत आहेत, त्यामुळे तत्कालीन शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांच्या कार्यकाळातील शिक्षकांच्या मान्यतांविषयी चौकशी सुरू आहे. या विभागात भोंगळ कारभार सुरू असून, मूळसंचिकाच तयार केलेल्या नाहीत. यामुळे असे किती शिक्षक आहेत, हे मूळसंचिका तयार झाल्यावर निदर्शनास येणार आहे. यासाठी त्या तयार करण्याच्या सूचना या आधीच देण्यात आल्या होत्या. मात्र यावर कोणतेही काम न झाल्याने या विभागातील चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दिल्या आहेत. तसेच आवश्यक मूळ कागदपत्र २५ मेपर्यंत उपलब्ध करून देण्याची मुदत देण्यात आली असल्याची माहिती त्यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
वेतन पथकाचीही तपासणी
शिक्षकांच्या वेतन पथकाचीही तपासणी केली. या ठिकाणीही घोळ आहे. पे युनिटमधील बिलांची तपासणी करण्यासह किती बिले पेंडिंग आहेत, किती शाळांचे पगार झाले, किती बाकी याचा आढावा घेतला असून, पगाराचा निधी उपलब्ध झाल्यावर तत्काळ वेतन ट्रान्सफर अदा तयार करण्याच्या सूचनाही दिल्या असल्याचे नितीन उपासनी यांनी सांगितले. तपासणीवेळी नितीन उपासनी यांच्यासोबत माध्यमिक शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील, उच्चमाध्यमिक लेखाधिकारी मनिष कदम, उपनिरीक्षक दिनेश देवरे आदींची उपस्थिती होती.