लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या पंधरा दिवसांपासून मनपा प्रशासनाने बजावलेल्या लाखोंच्या अवाजवी बिलांच्या मुद्द्यावर मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण पुकारले होते. मात्र, जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरीएंटचे नवीन रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनाने शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी गाळेधारकांना आंदोलन व उपोषण स्थगित ठेवण्याचा सूचना दिल्यानंतर मंगळवारी गाळेधारकांनी देखील साखळी उपोषण स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी गाळेधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून, उपोषण स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
हे उपोषण जिल्हाधिकाऱ्यांचा विनंतीमुळे स्थगित करण्यात आले असले तरी मनपाच्या अन्यायकारक भूमिकेला गाळेधारकांचा विरोध कायम राहणार असून, या निर्बंधाच्या फायदा घेत मनपा प्रशासनाने गाळेधारकांवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर गाळेधारकही पून्हा रस्त्यावर उतरतील असा इशारा गाळेधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. मनपा उपायुक्त प्रशांत पाटील यांच्या उपस्थितीत हे साखळी उपोषण सोडविण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ.शांताराम सोनवणे, पांडूरंग काळे, राजस कोतवाल, तेजस देपुरा, पंकज मोमाया यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.