जळगाव,दि.31- जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखविल्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या सुभाष भिकन मिस्तरी (रा.जळगाव) याने नोकरीला असताना जिल्हा परिषदेतूनच कार्यकारी अभियंता व मुख्य कार्यकारी अधिका:यांचा शिक्का चोरल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, मिस्तरीची न्यायालयाने गुरुवारी कारागृहात रवानगी केली.
जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून सुभाष मिस्तरी याने राजू दशरथ भोई (रा.दहिगाव संत, ता.पाचोरा) याच्या मदतीने 46 जणांची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. प्रत्येक उमेदवाराकडून एक लाखापासून ते तीन लाखार्पयत रक्कम घेण्यात आली. हे नियुक्ती पत्र बोगस असल्याचे उघड झाल्यानंतर मिस्तरी व भोई दोघंही फरार झाले. दोघांविरुध्द शहर पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. भोई याला अटक केल्यानंतर फरार मिस्तरीलाही अटक करण्यात आली. त्याची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने गुरुवारी सहायक निरीक्षक महेश जानकर यांनी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली.
दरम्यान, या गुन्ह्यात वापरलेले संगणक व हार्ड डिस्क पोलिसांनी जप्त केले आहे. एका दुकानात जावून मिस्तरी तेथे संगणकावर नियुक्त पत्रे टाईप करायचा व नंतर घरी त्या पत्रावर शिक्के मारत होता असे पोलिसांनी सांगितले.