जळगाव : महानगरपालिकेचे रुग्णालय आवश्यक त्या स्टाफसह रामेश्वर कॉलनी व सुप्रीम कॉलनी येथे सुरू करण्याबाबतची मागणी या परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली आहे. याबाबत त्या परिसरातील नागरिकांनी सभापती राजेंद्र घुगे पाटील यांना देखील निवेदन दिले आहे. या दोन्ही परिसरातही रुग्णालय सुरू झाल्यास तेथील सामान्य नागरिकांना यामुळे दिलासा मिळेल, असेही या निवेदनात म्हटले आहे.
स्वीकृत नगरसेवकपदासाठी रस्सीखेच
जळगाव : गेल्या आठवड्यात अमर जैन यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी शिवसेनेकडून अल्पसंख्याक चेहऱ्याला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. यात अवघ्या आठ मतांनी पराभव पत्करलेल्या माजी नगरसेविका पुत्र जाकीर पठाण यांचे नाव आघाडीवर आहे. यांच्यासह माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे, नीलेश पाटील यांचे नाव देखील आघाडीवर आहे. पुढील आठवड्यात संपर्कप्रमुख संजय सावंत याबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत.
महापालिकेचे स्वतंत्र ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर सुरू करा
जळगाव : महानगरपालिकेचे स्वतंत्र १०० ऑक्सिजन बेडचे कोविड-१९ केअर सेंटर सुरू करा, अशी मागणी स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील यांनी महापौर जयश्री महाजन यांच्याकडे केली आहे. तसेच याबाबतचा प्रस्ताव एका महासभेपुढे मांडण्यात यावा, याबाबत देखील राजेंद्र घुगे पाटील यांनी महापौरांकडे प्रस्ताव सादर केला आहे.