जळगाव- अभियांत्रिकी व इतर व्यावसाय अभ्यासक्रमांची प्रवेश प्रकिया दरम्यानात तांत्रिक अडचणींचा सामना कराव्या लागल्यानंतर सीईटीकडून प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती. अखेर सोमवारपासून या प्रवेश प्रक्रियेला नव्याने सुरूवात झाली आहे. विशेष: म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदणी शुल्क भरलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांचे शुल्क परतावा केला जाणार आहे.अभियांत्रिकी व इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या प्रतिक्षेत विद्यार्थी होते़ सीईटीचा निकाल सुध्दा लागला. त्यानंतर प्रवेश प्रक्रियेला सुरूवात देखील झाली. मात्र, एकाचवेळी असंख्य विद्यार्थ्यांकडून प्रवेश नोंदणी केली जात असल्यामुळे सर्व्हर डाऊन तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. वारंवार या अडचणीला सामोरे जावे लागत असल्यामुळे अखेर सीईटीकडून प्रवेश प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला व सोमवारपासून नव्याने ही प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे ठरविण्यात आले़ त्यानुसार वेळापत्रक सुध्दा जाहीर करण्यात आले. दरम्यान, सीईटीच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.असे आहे प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रकविद्यार्थ्यांना आता २४ ते ३० जुनपर्यंत आॅनलाइन प्रवेश नोंदणी करावयाची आहे. २५ जुन ते १ जुलैच्या सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणी आणि प्रवेश अर्ज निश्चित करायचा आहे. त्यानंतर २ जुलैला तात्पुरती यादी प्रसिध्द करण्यात येईल. ३ ते ४ जुलैच्या सायंकाळी ५ वाजेपर्यंत काही तक्रारी असल्यास विद्यार्थ्यांना फॅसिलिटी सेंटर (एफसी सेंटर) तक्रार करता येणार आहे़ अखेर अंतिम गुणवत्ता ५ जुलै रोजी प्रसिध्द होईल.एफसी केंद्र सुरूसीईटीकडून आता सेतू सुविधा केंद्र रद्द करण्यात आले असून त्या जागी फॅसिलिटी केंद्र सुरू करण्यात आली आहेत़ या फॅसिलिटी केंद्रांची लिस्ट संकेतस्थळावर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे़ दरम्यान, जुन्या पध्दतीनुसारच ही प्रवेश प्रक्रिया आता राबविण्यात येत आहे़ त्यामुळे महाविद्यालयांवरील गर्दी आता कमी झालेली आहेत.विद्यार्थ्यांना मिळणार पुन्हा भरलेले पैसेज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदणी पूर्ण करून पैसे भरले होते़ त्या विद्यार्थ्यांची राज्य सामाईक परीक्षा कक्षाकडून यादी संकेतस्थळवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्या यादीत ज्या विद्यार्थ्यांनी पैसे भरलेले आहेत त्यांची नावे आहेत. तर या विद्यार्थ्यांना सुमारे दीड ते दोन आठवड्यात पैसे पुन्हा परत केले जाणार आहेत. मात्र, नव्याने प्रक्रियेत सहभागी झाल्यानंतर पैसे पुन्हा त्यांना भरावे लागणार आहेत.
व्यवसाय अभ्यासक्रमांच्या प्रवेश नोंदणीला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 8:03 PM