जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा मंगळवारपासून सुरळीत प्रारंभ झाल्या. पहिल्या दिवशी ९,८४२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
विद्यापीठाच्या एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी., एम.एस.डब्ल्यू., एम.ए. (एम.सी.जे.), एम.बी.ए., एम.एम.एस. (कॉम्प्युटर मॅनेजमेंट), एम.सी.ए., एम.सी.ए. इंटीग्रेटेड पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रथम सत्रास प्रवेशित नियमित विद्यार्थ्यांच्या आणि प्रथम वर्ष इंजिनियरिंग सत्र, द्वितीय वर्ष इंजिनियरिंग सत्र ३, बी.फार्मसीचे सत्र १ आणि ३ आणि विद्यापीठ प्रशाळातील पदव्युत्तर वर्गांच्या सत्र १ या सर्व अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेण्यात येत आहेत. मंगळवारी पहिल्या दिवशी ९,८४२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षेसाठी लॉगिन केलेल्या ज्या विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी उद्भवल्या होत्या त्या आय.टी. समन्वयकांमार्फत दूर करण्यात आल्या. त्यामुळे लॉगिन झालेला कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिला नाही. विद्यार्थ्यांना तीन तासांचा विंडो कालावधी दिला असल्यामुळे सोईचे झाले. पदवीस्तरावरील परीक्षेसाठी ९० मिनिटे व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी १२० मिनिटांचा कालावधी देण्यात आला आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर या परीक्षा ऑनलाईन घेण्यात येत आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी. पी. पाटील यांनी दिली.