कुंदन पाटील
जळगाव : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वेळा बदलून शक्यतो शाळा-महाविद्यालयांये सकाळ सत्रातच भरविण्यात यावीत, तसेच जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णालयात स्वतंत्र उष्माघात प्रतिबंध कक्ष स्थापन करण्याच्या सूचना करीत जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारपासून जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे.
एप्रिल महिन्यात तापमानात प्रचंड वाढ होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली. या बैठकीत विविध विभागांतील अधिकाऱ्यांसह तज्ज्ञांनी सहभाग घेतला.नैसर्गिक आपत्तीत जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी यावेळी विभागनिहाय जबाबदारीही वाटप करण्यात आली आहे. त्यानुसार उष्माघातापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत. शाळा-महाविद्यालयांच्या वेळा बदलून शक्यतो त्या सकाळ सत्रातच भरावाव्यात आणि प्रत्येक रुग्णालयात उष्माघात प्रतिबंध कक्ष कार्यान्वीत करावा, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.