लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे जीएमसीचे केंद्र अखेर रेडक्रॉस रक्तपेढीत सुरू करण्यात आले आहे. मंगळवारी पहिल्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजेपासून या ठिकाणी लसीकरणाला सुरुवात झाली होती. दुपारी १२ पर्यंत ६५ जणांनी लस घेतली होती.
केंद्राच्या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात आले आहेत. या ठिकाणी बाहेर मंडप टाकून ज्येष्ठांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. यानंतर प्रतीक्षालय, नोंदणी, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष अशी त्रिस्तरीय व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आली आहे. गर्दी नको म्हणून तीन संगणकांवर नोंदणीची व्यवस्था करण्यात आली. निरीक्षण कक्षात वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल कळसकर कार्यरत होते. सुरुवातीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांच्या उपस्थितीत केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.