जळगाव : पहिल्या टप्प्यात भुसावळ ते भादली या तिसऱ्या मार्गाचे काम गेल्या आठवड्यात पूर्ण झाले असून भादली ते जळगाव या उर्वरित कामालाही नुकतीच सुरुवात झाली आहे. तर आता जळगाव ते शिरसोली या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला पिंप्राळा गेटपासून नुकतीच सुरुवात झाली आहे. या साडेअकरा किलोमीटरच्या मार्गावर ११ लहान पूल व ३ मोठे पूल उभारले जाणार आहेत.
मध्य रेल्वेच्या मुंबई ते दिल्ली या मार्गावर अप व डाऊन हे दोनच मार्ग असल्यामुळे या दोन्ही मार्गावर दर दहा मिनिटाला गाड्या धावत असतात. गाड्यांची वर्दळ लक्षात घेता रेल्वे मंत्रालयाने तीन वर्षांपूर्वी भुसावळ ते मनमाड या तिसऱ्या रेल्वे मार्गाला मंजूरी दिली होती. यापैकी भुसावळ रेल्वे प्रशासनाने पहिल्या टप्प्यात भुसावळ ते जळगाव या कामाला दोन वर्षांपूर्वी सुरुवात केली . यामध्ये सुरुवातीला भुसावळ ते भादली य साडेअकरा किलो मीटरचे काम हाती घेतले होते. वर्षभरात हे काम पूर्ण करुन, भादली ते जळगाव या कामालाही लगेच सुरुवात करण्याचे प्रशासनाचे नियोजन होते. मात्र, तरसोद, असोदा येथील शेतकऱ्यांना रेल्वेकडून पुरेसा मोबदला न मिळाल्यामुळे, हे काम थांबले होते. दरम्यान, गेल्या महिन्यात रेल्वे प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करुन, भादली ते जळगाव या उर्वरित मार्गाच्या कामालाही गेल्या आठवड्यात सुरुवात केली आहे.
दुसऱ्या टप्प्याच्या कामाला पिंप्राळा गेटपासून सुरुवात -गेल्या आठवड्यात जळगाव ते मनमाड या १६० किलो मीटरच्या तिसºया रेल्वे मार्गाचे रेल्वेचे उप मुख्य अभियंता रोहित थावरे व इतर अधिकाऱ्यांनी यांनी मोजमाप केले होते. मोजमाप केल्यानंतर या कामाला प्रत्यक्षात सुरुवातदेखील झाली आहे. जळगाव ते शिरसोली या ११ किलोमीटरच्या मार्गावर ठिकठिकाणी ११ लहान पूल उभारले जाणार आहेत. तर मोठ्या आकाराचे ३ मोठे पूल उभारले जाणार आहेत. आधी पूलांची उभारणी केल्यावर, त्यानंतर रुळ टाकले जाणार आहेत.डिसेंबर पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन असून, सध्या जेसीबीच्या सहाय्याने जमिन सपाटीकरणाचे काम सुरु आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यातही हे काम सुरु राहणार असून, भुसावळ येथील बी. एम. अग्रवाल व जळगाव येथील एम. एस. जैन या मक्तेदारांमार्फत या तिसऱ्या मार्गाचे काम करण्यात येत असल्याचे उप मुख्य अभियंता रोहित थावरे यांनी सांगितले.
शिरसोलीपर्यंत रेल्वेच्या हद्दीतच तिसरा मार्ग :भादली ते जळगाव या तिसºया मार्गाच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाकडे पुरेशी जागा नसल्यामुळे, हे काम रखडले होते. मात्र, जळगाव ते शिरसोली दरम्यान रेल्वेच्या हद्दीत पुरेशी जागा असल्यामुळे, हा तिसरा मार्ग रेल्वेच्या हद्दीतच तयार केला जाणार आहे. तर शिरसोलीपासून पुढे पाचोऱ्यापर्यंत रेल्वेची हद्द सोडून, तिसºया मार्गासाठी लागणाºया जागेसाठी भूसंपादनाच्या कामाला रेल्वे प्रशासनातर्फे लवकरच सुरुवात केली जाणार आहे.तिसऱ्या रेल्वेच्या कामाला पिंप्राळा गेटपासून सुरुवात करण्यात आली आहे. सुरुवातीला पुलांची उभारणी केली जाणार असून, त्यानंतर रुळ टाकण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. जळगाव ते शिरसोली हा पहिला टप्पा डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. -रोहित थावरे, उपमुख्य अभियंता, भुसावळ