राजेंद्र भारंबे
सावदा, जि. जळगाव : केळी उत्पादक शेतकरी संघाच्या वतीने रविवारी (दि. २३) सावदा, ता. रावेर येथे पहिल्या राज्यस्तरीय केळी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रभाकर महाजन बहुद्देशीय सभागृह सावदा (बनाना सिटी) येथे सकाळी ११ वाजता ही केळी परिषद होईल, अशी माहिती केळी उत्पादक शेतकरी संघाचे संस्थापक अध्यक्ष किरण चव्हाण यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. एकरी तीन टनापेक्षा अधिक उत्पादन घेणाऱ्या केळी उत्पादक शेतकऱ्यांचा या परिषदेत गौरव करण्यात येणार आहे.
केळी उत्पादक शेतकऱ्यांची आजची स्थिती नाजूक आहे. अवकाळी पाऊस, गारा, व्हायरस, बोगस रोपे, बोगस औषधी तसेच शेतकऱ्यांची पिळवणूक या समस्यांवर उपाययोजना सुचविण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या केळी परिषदेत आधुनिक केळीतील तंत्रज्ञान विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. डॉ. प्रशांत नाईकवाडी हे केळी पीक रोग नियंत्रण व सेंद्रिय शेती तसेच नंदलाल वसेकर हे निर्यातक्षम केळी याविषयी मार्गदर्शन करतील.