लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : शॉर्ट सर्किट होऊन स्टेट बँकेला आग लागून इलेक्ट्रिक साहित्य , संगणक सह इतर वस्तूंचे सुमारे दीड लाखाचे नुकसान झाल्याची घटना १३ रोजी रात्री अकरा वाजता घडली.
स्टेट बँकेचे ऑडिट चालू असल्याने बँक मॅनेजर नितीन वासनिक, सर्व्हिस मॅनेजर रजनीकांत पाटील, असिस्टंट मॅनेजर नवीन रेवरकर रात्री ९.३० वाजेपर्यंत बँकेत बसलेले होते. सुमारे ११ वाजेला अचानक धूर आणि जाळ दिसू लागल्याने सुरक्षा कर्मचारी दिलीप यशवंत पाटील याने बँकेतील आग विझवण्याच्या यंत्रणेने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न निष्फळ ठरल्याने त्यांनी तातडीने मागच्याच बाजूला असलेल्या अग्निशामक दलाला पाचारण केले.
वायरी व फर्निचर जळत असल्याने मोठ्याप्रमाणात धूर निघत होता अखेर खिडक्या तोडून नितीन खैरनार , दिनेश बिऱ्हाडे , फारुख शेख , आंनद झिम्बल आदींनी आग विझवली. जगदिश वंजारी यांनी ताबडतोब वीजपुरवठा बंद केला पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, राहुल लबडे, सुनील पाटील, डॉ. शरद पाटील यांनी भेट दिली.
कॅश विभागातच आग लागली होती.
त्यात पंखे , वायरी , नोटा मोजण्याचे मशीन , लाकडी दरवाजा , सात संगणक, माउस, हार्ड डिस्क आदी वस्तूंचे नुकसान झाले. तसेच आग विझवण्यासाठी खिडक्या तोडण्यात आल्या व भरपूर पाणी मारले. त्यामुळे इलेक्ट्रिक साहित्य खराब झाले. असे एकूण सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले. सुदैवाने रोख रकमेचे काहीच नुकसान झाले नाही. घटनेचे वृत्त कळताच बँकेचे झोनल अधिकारी दुर्गेश दुबे, मुख्य प्रबंधक रामदास पाटील, रवींद्र सराडे यांनी भेटी दिल्या. अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात आगीची नोंद करण्यात आली असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी करीत आहेत.