लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांपासुन वादग्रस्त ठरलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या अवसायकपदी हिंगणा जि. नागपूर येथील सहायक निंबधक चैतन्य नासरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. केंद्र सरकारच्या सहकार खात्याने याबाबतचे आदेश पारीत केले. त्यानंतर एक महिना उलटला तरी देखील राज्य सहकार आयुक्तांनी नासरे यांना त्यांच्या हिंगणा तालुका निबंधक पदावरून मुक्त केले नाही. त्यामुळे नासरे अद्याप बीएचआरच्या अवसायकपदी नियुक्त होऊ शकलेले नाहीत.
चैतन्य नासरे यांनी आपल्याला या पदावरून मुक्त करून बीएचआरच्या अवसायक पदी नियुक्त करावे, यासाठी राज्य सहकार आयुक्तांना पत्र पाठवले आहे. बीएचआरचे अवसायक जितेंद्र कंडारे यांना कार्यकाळ संपण्याच्या तीन दिवस आधी पदावर कंडारे यांना पदावरून दूर करण्यात आले. त्यांच्याजागी नासरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र याला देखील एक महिना उलटला. नासरे यांना राज्य सहकार आयुक्तांनी अद्याप हिंगणा तालुका निबंधक या पदावरून मुक्त केलेले नाही. जो पर्यंत त्यांना या पदावरून मुक्त केले जात नाही. तोपर्यंत ते बीएचआरच्या अवसायक पदाचा कार्यभार स्विकारु शकत नाही.
नासरे यांनी या आधी नागपूरातील काही सहकारी बँकांच्या अवसायकपदी काम केले आहे. त्यामुळे येथे आल्यावर नासरे हेे ठेवीदारांसाठी काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र त्यांची नियुक्ती रखडल्याने ठेवीदार वाऱ्यावरच आहेत.