मोहन सारस्वत/सैयद लियाकतजामनेर : राज्यात सत्ताबदल होऊन एक वर्ष झाल्यानंतर राज्य शासनाकडून नवीन कामांना मंजुरी मिळाली नाही व सुरु असलेल्या कामांसाठी मंजूर झालेल्या निधीतील राहिलेली रक्कम मिळत नसल्याने विकास कामे ठप्प पडली आहे. सत्ता बदलाचा मोठा फटका टेक्सटाईल पार्कच्या उभारणीस बसला असून, काम थंडावले आहे.तीन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील पहिले टेक्सटाईल पार्क जामनेरला होईल, अशी घोषणा केली होती. घोषणेनंतर पार्क उभारणीच्या कामाला गती मिळाली होती. असली महाजन यांनी केलेल्या औद्योगिक वसाहतीच्या जागेच्या भूमिपूजनानंतर जमीन सपाटीकरणास इतर कामे वेगात झाली.टेक्सटाईल पार्कसाठी अंबिलहोळ, गारखेडे व होळहवेली परिसरातील खासगी व शासकीय वनजमीन अधिग्रहणाची प्रक्रीया झाली. खाजगी जमीनधारकांकडून करारपत्र करण्यात आले असूून अद्याप मोबदला वाटप झालेला नाही. मोबदला देण्यासाठी एमआयडीसीकडे रकमेची मागणी केली असुन यानंतरच पुढील कामे सुरू होऊ शकतात. वाघूर उपसा सिंचन योजनेला निधी नाही वाघूर धरणातून शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी पुरविणाऱ्या उपसा सिंचन योजनेचे काम माजी मंत्री गिरीश महाजन यांनी पूर्णत्वाकडे नेले. अंतिम टप्प्यातील कामासाठी लागणारा निधी मिळत नसल्याने योजना कार्यान्वित होऊ शकली नाही. नगरपालिकेच्या कामांनाही ब्रेक जामनेर नगरपालिकेसाठी महाजन यांनी युती शासन काळात विकास कामांसाठी निधीची तरतूद केल्याने पाण पुरवठा, भूमिगत गटार व सोनबरडी टेकडी विकास योजनेच्या कामांना सुरुवात झाली. मंजूर झालेल्या ३५ कोटी निधीपैकी साडेनऊ कोटीचा पहिला हप्ता मिळाल्यानंतर कामांना सुरुवात झाली. दुसऱ्या टप्यातील निधीची मागणी केली आहे. निधीअभावी रस्ता दुरुस्तीचे काम रखडल्याचे पालिका पपदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सोनबरडी विकासासाठी मंजूर १४.५ कोटीपैकी फक्त दीड कोटीचा निधी मिळाला आहे. निधीअभावी कामे ठप्प पडली आहे.
जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने टेक्सटाईल पार्क होणे गरजेचे आहे. शासनाच्या आडमुठे धोरणामुळे निधी मिळत नाही. ५० टक्के तरी निधी द्यावा जेणेकरुन काम सुरू होऊ शकेल. जळगांव येथील मेडिकल कॉलेजच्या उर्वरीत कामासाठी ७५० कोटीचा निधी आमच्या शासन काळात मंजूर करुन या कामांचे टेंडरदेखील निघाले, मात्र सध्याच्या शासनकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे काम रखडले आहे. महाविकास आघाडी शासनाच्या एक वर्षाच्या काळात कोणतेही नवीन काम सुरू झाले नाही व सुरू असलेल्या कामांना निधी न देता ती रोखून धरली गेली. - गिरीश महाजन, माजीमंत्री, आमदार