ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 3 - इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्र आणि आयएमए जळगाव यांच्या संयुक्तविद्यमाने ‘अॅम्सकॉन 2017’ ही अॅॅकॅडमी ऑफ मेडिकल स्पेशालिटी यांची राज्यस्तरीय परिषद 5 व 6 ऑगस्ट रोजी जळगाव येथे हॉटेल कमल पॅराडाईज येथे आयोजित करण्यात आली आहे. सकाळी 9 वाजता या परिषदेला सुरुवात होईल. उदघाटन सोहळा दुपारी 4 वाजता आयएमएचे नियोजित राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर यांच्याहस्ते होणार आहे. या राज्यस्तरीय परिषदेला राज्यभरातून 600 डॉक्टर उपस्थित राहणार आहे. या परिषदेच्या आयोजनाचा बहुमान प्रथमच जळगाव आयएमएला मिळाला असल्याचे सचिव डॉ. राजेश पाटील यांनी सांगितले. या परिषदेला वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अशोक तांबे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत महाराष्ट्र आयएमएचे माजी उपाध्यक्ष डॉ. अनिल पाटील आणि नुकतेच महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलवर निवड झालेले डॉ. प्रताप जाधव यांचा सन्मान केला जाणार आहे.माजी खासदार डॉ.उल्हास पाटील हे या परिषदेचे प्रमुख पॅट्रन आहेत. डॉ. विलास भोळे हे आयोजन समितीचे अध्यक्ष असून डॉ. स्नेहल फेगडे सचिव आहेत.