मुक्ताईनगर, जि.जळगाव : मुक्ताईनगर तालुका कुंभार समाज संघटनेतर्फे राज्यस्तरीय कुंभार समाजाचा मेळावा तसेच विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व समाजातील पुरस्कारार्थी मान्यवरांचा गौरव सोहळा रविवारी येथील सुराणानगर परिसरात आयोजित भव्य कार्यक्रमात पार पडला. राज्य शासनाने आश्वासन देऊनदेखील कुंभार समाजाला आरक्षण न दिल्याचा रोषही मेळाव्याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.अध्यक्षस्थानी फेकरीचे सरपंच प्रभाकर सोनवणे होते. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष नजमा तडवी, जिल्हा शिवसेनाप्रमुख चंद्रकांत पाटील, डॉ.जगदीश पाटील, कुंभार समाजाचे जळगाव जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर कापडे, लेखक निंबाजी हिवरकर, प्रभाकर कापडे, भोई समाजाचे जिल्हाध्यक्ष एस.ए.भोई, धनलाल शिरसाट, बबनराव जगदाळे, सुरेश बहाळकर, सखाराम मोरे, सुभाष पंडित, राहुल कुंभार, तालुकाध्यक्ष रामभाऊ पुन्नासे हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.मेळाव्यात झालेले ठराव-समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी नव तरुणांची संघटना उभारणे व आरक्षणाचा लढा नव्याने सुरू करणे, वीटभट्टी यांचे नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्यावर शेतकऱ्यांप्रमाणे अनुदान देणे, एक हजार विटांमागे दीड हजार रुपये अनुदान देणे, व्यवसायासाठी चार टक्के दराने २० लाख रुपये कर्ज देणे व शेतकºयांप्रमाणे २५ टक्के अनुदान देणे, पोटशाखा बंद करून रोटीबेटी व्यवहार पाळणे, वधू-वर परिचय मेळावे सुरू करणे, पदाची अभिलाषा न ठेवता समाजकार्य करणे, हुंडा घेणार नाही व देणारही नाही, एक दिवसाचा विवाह कार्यक्रम ठरवणे, विवाह संस्था सैराट होऊ न देणे, शिक्षणाचा प्रसार करणे, व्यावसायिकांना विवाहासाठी मुली देणे यासारखे ठराव याप्रसंगी करण्यात आले.अध्यक्ष भाषणात समाजाचे विदारक परिस्थिती व शासनाकडून केल्या विविध मागण्या-कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांनी आपल्या भाषणात घणाघात करताना सांगितले की, स्मशानभूमीत व नद्यांच्या काठावर राहणारा कुंभार समाज हा अतिशय मेहनती समाज आहे. समाजासाठी यापूर्वी नेमण्यात आलेला वझे आयोग हा चुकीचा होता. म्हणून समाजाला आरक्षण मिळाले नाही. त्यासाठी आरक्षण मिळण्यासाठी लढा उभारण्याची गरज असून जुन्या-जाणत्या नेत्यांनी मार्गदर्शन करावे व नव तरुणांची फळी तयार करून आरक्षणाचा लढा लढा सुरू करावा, असे आवाहन त्यांनी केले. समाजातील व्यसनाधीनता नष्ट करून शिक्षणाची कास धरण्याचे आवाहन त्यांनी केले. निवडणुकीपूर्वी आरक्षणाच्या आश्वासन देणाºया शासनाचा निषेधही याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.वैशिष्टे-सुमनबाई सोनवणे या वयोवृद्ध महिलेने व्यासपीठावर येऊन मुंबईला विधानभवनावर कुंभार समाजाचा मोर्चा न्या व आरक्षण हा आपला हक्क आहे, तो पदरात पाडून घ्या, असे आवाहन करत संत गोरोबा कुंभार यांच्या जीवनावर अभंग गायले.किरण कुंभार यांनी तयार केलेल्या समाजाच्या अॅपचे उद्घाटनदेखील याप्रसंगी करण्यात आले.प्रभाकर कापडे यांनी अनाथ आणि समाजातील अनाथ मुले दत्तक घेत त्यांच्यासाठी अनाथाश्रम सुरू करण्याची घोषणा केली.याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच समाजातील व समाजाच्या बाहेरील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाºया पुरस्कारार्थींच्या गौरव करण्यात आला.सूत्रसंचालन सुरेश अर्जुन बोरसे यांनी, तर आभार सरदार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रामभाऊ कुंभार, नारायण पुनासे, भगवान हिवरकर, गणेश न्हावकर, अनिल मोरे, रवींद्र सोनवणे, उमेश खानजोडे, अमोल मोरे, संगीता न्हावकर, नीलिमा बागुल, रिता सोनवणे यांनी परिश्रम घेतले.
मुक्ताईनगर येथे कुंभार समाजाचा राज्यस्तरीय मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 7:09 PM
मुक्ताईनगर तालुका कुंभार समाज संघटनेतर्फे राज्यस्तरीय कुंभार समाजाचा मेळावा तसेच विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व समाजातील पुरस्कारार्थी मान्यवरांचा गौरव सोहळा रविवारी येथील सुराणानगर परिसरात आयोजित भव्य कार्यक्रमात पार पडला.
ठळक मुद्देमेळाव्यात विविध ठरावगुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरवसमाजातील काही पुरस्कारार्र्थींचाही सन्मान