जळगाव : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी राज्यस्तरीय राष्ट्रीय प्रज्ञाशोध (एनटीएस) परीक्षा रविवारी जिल्ह्यातील दहा केंद्रांवर पार पडली. यात पेपर-१ ला १०५ तर पेपर-२ ला १०७ विद्यार्थ्यांनी दांडी मारली.
प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना अधिकाधिक विद्यार्जनासाठी प्रोत्साहित करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय परीक्षेतून देशभरातील २००० प्रज्ञावंत विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरूपात आर्थिक मदत करण्यात येते. मूलभूत विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि वाणिज्य शाखांमध्ये पीएचडी पदवी प्राप्त करेपर्यंत विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, इंजिनिअरिंग, वैद्यकीय, व्यवस्थापन आणि विधी या विद्याशाखांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती पदव्युत्तर पदवीपर्यंतच दिली जाते.
२,४७७ विद्यार्थ्यांनी केली होती नोंदणी
राज्यस्तरीय राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी जिल्ह्यातून २ हजार ४७७ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. रविवारी जिल्ह्यातील दहा केंद्रांवर सकाळी बौध्दिक क्षमता चाचणी व दुपारी शालेय क्षमता चाचणी या दोन विषयांवर प्रत्येकी शंभर गुणांवर पेपर घेण्यात आला. बौध्दिक क्षमता चाचणी पेपरला २३७२ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती, तर १०५ विद्यार्थ्यांनी दांडी मारली होती. नंतर दुपारी झालेल्या शालेय क्षमता चाचणी पेपरला २३७० विद्यार्थ्यांनी हजेरी लावली, तर १०७ विद्यार्थ्यांनी दांडी मारली होती.