जळगाव :
अदानी समुहात २० हजार कोटी रुपये शेल कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवण्यात आले आहेत. हा पैसा कुठून आला ? हाच प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला होता; पण त्यावर त्यांना उत्तर मिळाले नाही. उलट कारवाई करण्यात आली. देशात ‘स्टेट स्पॉन्सर करप्शन’ सुरू आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॉ. संजय लाखे पाटील यांनी शुक्रवारी, जळगाव येथील पत्रकार परिषदेत केला.
लाखे पाटील म्हणाले, की मोदी हेच अदानी आणि अदानी हेच मोदी आहेत म्हणूनच केंद्र सरकार अदानींच्या गैरव्यवहाराची चौकशी घटनात्मक संस्थांच्या माध्यमातून होऊ देत नाही. देशात ‘स्टेट स्पॉन्सर करप्शन’ चालले आहे. अदानी समुहातील गुंतवणुकीबाबत नामांकित संस्थांचे नकारात्मक अहवाल असतानादेखील देशातील सरकारी बँका व एलआयसीमधील जनतेचा पैसा अदानी समुहात गुंतविण्यात आला आहे.
राहुल गांधींचा आवाज दाबण्याचे काम...देशातील जनतेला खरी माहिती मिळण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे. त्यामुळे अदानी स्कॅम आणि राहुल गांधी यांच्यावरील कारवाईच्या विरोधात देशातील विरोधक एकत्र आले आहेत. मोदी व अदानी यांचे नाते काय, असा प्रश्न राहुल गांधी यांनी केला होता. त्यावर त्यांना कारवाईला सामोरे जावे लागले. भाजपा व परिवारातील संघटना अदानींना वाचविण्याचे काम करत आहेत. राहुल गांधींवर आरोप झाले, त्यावर त्यांना संसदेत बोलू दिले नाही. आवाज दाबण्यात आला.
तेव्हाच देश भ्रष्टाचारमुक्त होईलकेंद्र सरकार ईडीच्या माध्यमातून विरोधकांचा छळ करत आहे. तपासी यंत्रणांना मागे लावून भ्रष्ट राजकारणी भाजपात घेतले जात आहेत. भाजपा सत्तेतून जाईल तेव्हाच देश भ्रष्टाचारमुक्त होईल, असा दावा डॉ. संजय लाखे पाटील यांनी केला.
बाजार समितीत आघाडीचा प्रयत्न
जळगावमध्ये बाजार समिती निवडणुकीत इच्छुकांना अर्ज भरायला सांगितले आहे. अर्जांच्या छाननीनंतर आघाडीचा निर्णय घेतला जाईल. त्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी दिली. पत्रकार परिषदेला प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, योगेंद्र पाटील, शहर अध्यक्ष श्याम तायडे, सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, युवक जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, जळगाव तालुका अध्यक्ष मनोज चौधरी, मनोज सोनवणे, जगदीश गाढे, शरद देशमुख आदी उपस्थित होते.