वाहने पार्क करण्यासाठीही जागा नाही : मनपाच्या कारवाईलाही थारा नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील मुख्य रस्त्यांवर दिवसेंदिवस अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर होत जात आहे. रस्त्यालगत विक्रेत्यांनी दुकाने थाटल्यामुळे पायी चालण्यासह
वाहने पार्क करण्यासाठी शहरातील रस्त्यांलगत जागाच मिळत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठ परिसर असो वा उपनगरातील परिसर सर्वच भागातील रस्त्यालगत सारखीच परिस्थिती दिसून येत आहे. मनपाकडून या रस्त्यांलगत लागणाऱ्या
दुकानांवर अनेकवेळा कारवाई करण्यात आली आहे. मात्र, कायमस्वरूपी तोडगा काढण्यास महापालिकेला अपयश आले आहे. मनपावर येणारा राजकीय दबाव हादेखील यासाठी
कारणीभूत आहे. गणेश कॉलनी चौक परिसर, शहर पोलीस स्टेशन परिसर, काँग्रेस भवन परिसर, नेरीनाका परिसर असो वा शहरातील इतर भागातील परिसर सर्वच रस्त्यांवर विक्रेत्यांनी आपले राज्य केले आहे.
विशेष म्हणजे टॉवर चौक ते नेहरू चौक दरम्यानच्या रस्त्यावर व चित्रा चौक ते शिवतीर्थ मैदानापर्यंतच्या रस्त्यादरम्यान तर वाहने चालविणेदेखील कठीण झाले आहे.
कोरोनाचा संसर्गाचा धोका
रस्त्यालगत दुकाने लावणाऱ्यांकडे कपडे व इतर साहित्य खरेदी करत असताना मोठ्या प्रमाणात गर्दीदेखील होत असते. याठिकाणी ग्राहकांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही उपाययोजना नसतात, यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचींही शक्यता असते.
स्वस्त मिळते म्हणून ग्राहकांची गर्दी
रस्त्यालगत विक्री होणाऱ्या खाद्यपदार्थ असो वा कपड वा इतर साहित्य याठिकाणी ग्राहकांना कमी दरात वस्तू व पदार्थ उपलब्ध होतात. यामुळे ग्राहकांची रस्त्यालगतच्या दुकानावरील सहित्य खरेदीला पसंती असते.
कोट..
मनपा प्रशासनाकडून सातत्याने रस्त्यालगत अनधिकृत पद्धतीने व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच तोंडावर मास्क नसलेल्यांवरही मोठी कारवाई करण्यात आली आहे. गेल्या महिनाभरात अनेक भागांतील अतिक्रमणावर नियंत्रण आले आहे.
-संतोष वाहुळे, उपायुक्त, मनपा