लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात अमृत योजनेंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा व मलनिस्सारण योजनेच्या कामांचा आढावा घेण्यासाठी बुधवारी मुंबईत राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. या बैठकीत जळगाव शहरातील अमृत अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा व मलनिस्सारण योजनेच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे. याच बैठकीत मनपाकडून शहरातील वाढीव भागातील कामांचा प्रस्ताव देखील सादर केला जाणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेची कामे राज्यातील काही महानगरपालिका व नगरपालिकांच्या हद्दीत सुरू आहेत. त्यापैकी ज्या महानगरपालिकांमधील पाणीपुरवठा व मलनिस्सारण योजनांची कामे संपण्यात आली आहेत किंवा संपली आहेत. अशा महानगरपालिका व नगरपालिकांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही आढावा बैठक राज्यस्तरीय तांत्रिक समितीचे अधिकारी घेणार आहेत. या दोन्ही योजनांमधील बचतीमधून अतिरिक्त कामे करण्यात येणार असून, या अतिरिक्त कामांच्या प्रस्तावांच्या अनुषंगाने ही बैठक घेतली जात आहे. ही बैठक मंगळवारी होणार होती; मात्र काही अडचणी निर्माण झाल्याने ही बैठक आता बुधवारी होणार आहे. या बैठकीत मनपाचे प्रकल्प अभियंता योगेश बोरोले यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.
‘त्या’ १६५ कॉलन्यांमधील रखडलेल्या कामाला मिळू शकते मंजुरी
शहरात अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून, आतापर्यंत या योजनेचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, मनपाने शहरातील वाढीव भागांचा समावेश आधीच्या प्रस्तावात न केल्यामुळे शहरातील तब्बल १६५ कॉलन्यांमध्ये पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू झाले नव्हते. मनपाने नवीन प्रस्ताव तयार करून, अमृत योजनेतील बचत झालेल्या रकमेतून आता १६५ कॉलन्यांमधील १८५ किमीचे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यानुसार मनपाने ३० कोटींचे अंदाजपत्रक देखील तयार केले होते. मजीप्राच्या तांत्रिक समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, आता राज्याचा तांत्रिक समितीच्या मंजुरीची प्रतीक्षा असून, या बैठकीत काही महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.