व्यापारी संकुलामध्ये अस्वच्छता
जळगाव : शहरातील विविध ठिकाणच्या व्यापारी संकुलांमध्ये अनियमित साफसफाईअभावी मोठ्या प्रमाणावर कचऱ्यांचे ढीग आढळून येत आहेत. यामुळे तेथील व्यावसायिकांना व त्या ठिकाणी खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. तरी मनपा प्रशासनाने या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी होत आहे.
विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईची मागणी
जळगाव : शहरात एकीकडे कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असतांना, दुसरीकडे बाजारपेठेत व इतर सार्वजनिक ठिकाणी आजही नागरिक विनामास्क फिरतांना दिसून येत आहेत. परिणामी यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिकच बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरी मनपा प्रशासनाने या विनामास्क प्रवाशांवर कारवाईची मागणी होत आहे.
बस स्थानकात २४ तास पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी
जळगाव : शहरातील नवीन बस स्थानकात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर सोनसाखळी व पाकीट चोरीच्या घटना घडत आहेत. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आगारात २४ तास पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
पार्किंगअभावी स्थानकात वाहतूक कोंडी
जळगाव : नवीन बस स्थानकात गेल्या दोन वर्षांपासून पार्किंग बंद असल्यामुळे प्रवाशांना थेट स्थानकात दुचाकी पार्किंग करावी लागत आहे. परिणामी यामुळे स्थानकातच वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. तरी आगार प्रशासनाने तातडीने पार्किंगची सुविधा सुरू करण्याची मागणी होत आहे.
जंतुनाशक औषधांची फवारणी करण्याची मागणी
जळगाव : अनियमित साफसफाईअभावी शहरातील अनेक भागात कचऱ्यांचे ढीग साचल्याने, मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तरी मनपा प्रशासनाने शहरात सर्वत्र जंतुनाशक औषधांची फवारणी करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.