यावेळी नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांनी या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत वेतनाच्या फरकाचे बिल तयार झाल्यानंतर लागलीच पहिल्या हप्त्याचे बिल अदा केले जाईल, असे आश्वासन दिल्याने संघटनेने आभार व्यक्त केले.
निवेदनात म्हटले आहे की, शासन निर्णयाप्रमाणे शासकीय, निमशासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दि. १ जानेवारी २०१८पासून वेतन आयोग लागू केलेला असून, थकबाकी फरकाची रक्कम समान हप्त्यात देण्याचे मान्य करून महाराष्ट्रातील बहुतेक नगरपरिषदांनी फरकाच्या या हप्त्याच्या रकमा वाटपदेखील केलेल्या आहेत. असे असताना अमळनेर परिषदेने अद्यापही पहिला हप्तादेखील दिलेला नसल्याने सर्व कर्मचारी वर्गात असंतोषाचे वातावरण तयार झाले आहे. तरी या बाबींचा विचार करून सर्व कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाच्या फरकाच्या रकमेचा पहिला हप्ता त्वरित अदा करावा, अशी विनंती करण्यात आली आहे. शासन निर्णयाप्रमाणे आयोगाच्या थकबाकीच्या फरकाचा हप्ता सात दिवसाच्या आत न मिळाल्यास आठव्या दिवसापासून आम्हास नाइलाजाने काम बंद आंदोलनाचा मार्ग अवलंबवावा लागेल, असा इशारा अध्यक्ष प्रसाद शर्मा, सहसचिव सोमचंद संदानशिव तसेच राष्ट्रीय नगरपालिका मजदूर महासंघाचे अध्यक्ष ॲड. शकील काझी, सहसचिव अविनाश संदानशिव यांनी दिला आहे.