लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मोकाट कुत्र्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी शिवसेना महिला आघाडी, युवा सेना तसेच विविध सामाजिक संघटनांनी स्थायी समितीच्या सभेतच मोकाट व पाळीव कुत्रे सोबत आणून प्रशासनाला निवेदन सादर केले. दरम्यान, मोकाट कुत्र्यांची समस्या येत्या आठवडाभरात सोडवली नाही तर शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
शहरातील विविध कॉलनी तसेच उपनगरांमध्ये मोकाट कुत्र्यांची समस्या गंभीर होत चालली आहे. याबाबत लोकमतकडून देखील या प्रश्नावर प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘लोकमत’ च्या वृत्ताची दखल घेत शिवसेनेकडून आगळ्या वेगळ्या स्टाईलने मनपा आयुक्त व स्थायी समिती सभापती यांना निवेदन देण्यात आले.
पाळीव कुत्रे आणले सभागृहात
शिवसेना महिला आघाडीच्या अरुणा पाटील, भारती काळे, अमोल कोल्हे, अंकित कासार आदींसह इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पाळीव कुत्रे थेट सभागृहात आणून प्रशासनाला निवेदन सादर केले. विशेष म्हणजे, प्रशासनाला जाग यावी, म्हणून प्रतीकात्मकरित्या कुत्र्याच्या पिल्लाच्या हातून निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन स्थायी समितीचे सभापती राजेंद्र घुगे पाटील यांनी स्वीकारले.
तर मोकाट कुत्रे आणले असते, सेनेच्या आंदोलनावर भाजप नगरसेविका आक्रमक
स्थायी समिती सभा सुरू झाल्यानंतर शिवसेनेच्या महिला आघाडीच्या सदस्यांनी सभेत प्रवेश केला. तसेच सोबत काही पाळीव कुत्रे देखील आणले. त्यामुळे भाजपच्या काही महिला नगरसेविकांनी या आंदोलनावर आक्षेप घेतला. तसेच निवेदन द्यायचे असेल तर सभा संपल्यावर देखील देता आले असते. तसेच प्रश्न मोकाट कुत्र्यांचा असताना पाळीव कुत्रे का आणले असाही प्रश्न नगरसेविका ज्योती चव्हाण यांनी उपस्थित केला. तसेच मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर सत्ताधारी नगरसेवकांनी देखील आंदोलन केले होते. त्यामुळे राजकारण करण्यात येऊ नये अशीही मागणी नगरसेवक कुलभूषण पाटील यांनी केली. मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर पंधरा दिवसात तोडगा काढावा अन्यथा शहरातील मोकाट कुत्रे मनपाच्या सभागृहात सोडण्यात येतील असा इशारा शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.